उस्मानाबाद : सकाळी फुले उधळून डिस्चार्ज, अन् रात्री पुन्हा पॉझिटीव्ह!

तानाजी जाधववर
शनिवार, 23 मे 2020

कळंब तालुक्यातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात पाथर्डी येथील पती-पत्नीचा समावेश होता.

उस्मानाबाद : जिल्हा आरोग्य आरोग्य यंत्रणेने कोरोना बाधित रुग्णाचा तिसरा अहवाल येण्याआधीच रुग्णाला शुक्रवारी (ता. २३) कोरोनामुक्त घोषित करून फुलांची उधळण करीत घरी सोडले. दरम्यान, रात्री उशिरा आलेल्या अहवालात रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

कळंब तालुक्यातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात पाथर्डी येथील पती-पत्नीचा समावेश होता.  त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या स्वॅबचे नमुने घेऊन दोन चाचणी घेण्यात आल्यानंतर गुरुवारी तिसऱ्या चाचणीसाठी पुन्हा स्वॅब घेण्यात आला होता. पण, दोन चाचण्याचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे पाहून तिसर्‍या चाचणीचा अहवाल येण्याआधीच या दाम्पत्याला रुग्णालय प्रशानाकडून रोगमुक्त करण्यात आले. शुक्रवारी सकाळीच त्यांना डिस्जार्ज देण्यात आला होता. त्यातील महिलेच्या कोविड-१९ चाचणीचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने गोंधळ उडाला.  हे नमुने तपासणीसाठी लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवून देण्यात आले होते. दरम्यान, रुग्णाची प्रकृती ठीक आहे. 

- कोरोना संबंधातील 10 महत्त्वाच्या बातम्या; वाचा एका क्लिकवर  
 
नियम काय सांगतो?
कोरोनाबाधित रुग्णाच्या सलग तीन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरच त्याला सुटी दिली जात होती. मात्र, आयसीएमआरच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार रुग्णाची कुठलीही चाचणी न करता थेट दहाव्या दिवशी त्याला रुग्णालयातून सुटी दिली जाणार आहे. सुटी देण्यात आलेल्या रुग्णाला आता १४ ऐवजी सात दिवसांसाठी होम क्वारंटीन राहावे लागणार आहे. कोरोनाविषयी केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कोरोनाच्या संदिग्ध रुग्णाच्या पहिल्या चाचणीनंतर तो  पॉझिटिव्ह आल्यास त्यावर दहा दिवस उपचार केले जाणार आहेत. यानंतर त्याची पुन्हा चाचणी केली जाणार नाही. दरम्यान, मध्यम लक्षणे असलेले रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना दहाव्या दिवशीच चाचणीशिवाय सुटी दिली जाणार आहे; परंतु सुटी देत असताना रुग्णाला सलग तीन दिवस ताप नसावा किंवा आॅक्सिजनची गरज भासू नये, अशी अट आहे. 

कोथरुडकरांनो सावधान! कोरोनाचा वाढतोयं धोका...
 
ही महिला कधी झाली होती भरती?

कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात पाथर्डी येथील पती-पत्नीवर उपचार झाले. १४ मे रोजी हे दांपत्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.  उपजिल्हा रुग्णालयातून त्यांना शुक्रवारी (ता. २२) आरोग्य प्रशासनाच्या वतीने फुलांची उधळण करीत त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. 
 
परंडा येथील युवकाला बाधा
परंडा येथील एका ३४ वर्षीय युवकाचाही रिपोर्टही शुक्रवारी पॉझिटिव्ह आला आहे. तोही परजिल्ह्यातून आलेला आहे. त्याच्यावर सध्या कोविड वॉर्डात उपचार सुरू आहेत. 

औरंगाबादेतही घडली होती घटना
औरंगाबादेत यापेक्षा भयंकर प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह तिच्या नातेवाइकांकडे रुग्णालयाने सुपूर्त केला होता. पण, तिचा तिसऱ्या स्वॅबचा अहवाल येणे बाकी होते. या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीवेळी शंभरावर नागरिकांची उपस्थिती होती. नंतर रात्री या महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. या गलथानपणामुळे राज्यभरात संताप व्यक्त झाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recovered patient tests positive again in Osmanabad