नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अनुदान !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मार्च 2019

एक ते तीन लक्ष कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ दोन टक्के दराने व्याज भरावे लागते आणि तीन लक्ष रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सहा टक्‍के दरानेच व्याज भरावे लागते.

औरंगाबाद : वर्ष 2016-17 या वर्षातील कर्जाची नियमित फेड करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्याज सवलत अनुदान योजनेअंतर्गत एक कोटी 25 लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. ते 31 मार्चपर्यंत वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक अनिल दाबशेंडे यांनी दिली. 

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत अनुदान योजनेचा लाभ हा नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येतो. शासनाच्या सवलतीनुसार प्रति एकर, पीकनिहाय, बागायत, जिरायत शेतीनुसार हे कर्ज देण्यात येते. यात एक लक्षपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्याजाची केंद्र व राज्य सरकार परतफेड करते. एक ते तीन लक्ष कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ दोन टक्के दराने व्याज भरावे लागते आणि तीन लक्ष रुपयांपेक्षा अधिक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सहा टक्‍के दरानेच व्याज भरावे लागते.

शेतकऱ्यांना मिळणारी ही सवलत जिल्हा नियोजन समितीमार्फत वाटप करण्यात येते. वर्ष 2016-17 मध्ये खरीप, रब्बी हंगामाचे नियमित कर्ज फेडणाऱ्या 24 हजार 178 शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन समितीमार्फत अक कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी वाटप करण्यात आला आहे. अनुसूचित जाती-जमातीमधील शेतकऱ्यांना समाजकल्याण विभागाच्या वतीने मिळणारी मदत ही 488 शेतकऱ्यांना दोन लक्ष 38 हजार रुपये वाटप करण्यात आली. योजनेतील राज्य शासनाच्या वाट्याचा एक कोटी 25 लक्ष रुपयांचा निधी फेब्रुवारी महिन्यात प्राप्त झाला आहे. हा निधी 31 मार्चपर्यंत संपूर्ण वाटप केला जाणार असल्याचेही श्री. दाबशेंडे यांनी सांगितले. 

प्रति एकर पीकनिहाय देण्यात येणारे कर्ज -
 

पिकाचे नाव - मिळणारे कर्ज -
ऊस 40 ते 45 हजार 
कापूस 12 ते 21 हजार 
सोयाबीन 17 ते 21 हजार 
मका 11 ते 14 हजार 
तूर 12 ते 15 हजार 
भुईमूग 12 ते 15 हजार 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Regular loan payers will get subsidy