बीड जिल्ह्यात कत्तलखान्यातील जनावरांची सुटका, पोलिस पथकाची कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 May 2020

खडकत येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडजवळ गोवंशीय प्राण्यांची कत्तल होत असल्याची माहिती डीवायएसपी लगारे यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार पथकाने खडकत येथे छापा मारला.

आष्टी (जि. बीड) - तालुक्यातील खडकत येथे कत्तलखान्यावर पोलिसांनी घातलेल्या छाप्यात १५ जनावरांची सुटका करण्यात आली. या वेळी घटनास्थळावरून दोन आरोपी फरारी झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे यांच्या पथकाने शुक्रवारी (ता. दोन) दुपारी ही कारवाई केली. 

खडकत येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला एका पत्र्याच्या शेडजवळ गोवंशीय प्राण्यांची कत्तल होत असल्याची माहिती डीवायएसपी लगारे यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत मोरे, पोलिस शिपाई पठाण, पुळेकर, राठोड, श्रीराम माने यांच्या पथकाने खडकत येथे छापा मारला असता ४०० किलो मांस, वाहतुकीसाठीचे वाहन छोटाहत्ती (एमएच१४ एझेड५८०७) व कत्तलीसाठी आणलेली लहान व मोठी १५ जनावरे व आढळून आली.

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

पोलिस आल्याची माहिती होताच या वाहनाचा चालक व कत्तल करणारा शाहरूख कुरेशी हे दोघे तेथून फरारी झाले. पोलीस नाईक श्रीराम माने यांनी आष्टी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गोवंशीय प्राणी संरक्षण अधिनियमानुसार वरील दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Release of animals from slaughter house in Beed district, action of police squad