वित्त आयोगाचा अखर्चित व व्याज रक्कम परत करा, बीड झेडपीचे ग्रामपंचायतींना आदेश  

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

व्याजाची रक्कम परत वर्ग करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना दिले आहेत. आतापर्यंत तीन कोटी १२ लाख रुपयांची रक्कम प्राप्तही झाली असून आणखी दोन कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. १३ व्या वित्त आयोगाचा निधीही परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

बीड - ग्रामपंचायतींना शासनाकडून विकासकामांसाठी वर्ग केलेल्या वित्त आयोगाच्या अखर्चित निधीवर आलेल्या व्याजाची रक्कम परत वर्ग करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना दिले आहेत. आतापर्यंत तीन कोटी १२ लाख रुपयांची रक्कम प्राप्तही झाली असून आणखी दोन कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. १३ व्या वित्त आयोगाचा निधीही परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

शासन ग्रामविकास विभागाने ता. २९ मे रोजी तसे आदेश निर्गमित केले आहेत. काही ग्रामपंचायतींनी या व्याजाची रक्कमही खर्च केल्याने त्यांच्यासमोर आला प्रश्न निर्माण झाला आहे. १३ व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवरील व्याजाची रक्कम तत्काळ आरजीएसए या खात्यात जमा करून घेण्याचे आदेशात म्हटले आहे. सदर रक्कम ग्रामपंचायतीने परस्पर आरजीएसए खात्यात जमा करू नये, ग्रामपंचायत स्तरावरील रक्कम जिल्हा परिषदेच्या खात्यात जमा करून घेण्यात यावी.

हेही वाचा - रोहयोत ठाण मांडलेल्या सव्वाशेवर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या

ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद स्तरावरील एकत्रित रक्कम उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांनी आरजीएसएच्या खात्यात जमा करावी, असे तातडीचे आदेश आल्यानंतर बीड उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. जिल्हा परिषदेकडे वरील व्याजाची रक्कम जमा करण्याची कारवाई सुरू झाली आहे. आतापर्यंत तीन कोटी १२ लाख रुपयांची रक्कम प्राप्तदेखील झाली आहे. 

शासन आदेशानुसार रक्कम जमा करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. ६० टक्के ग्रामपंचायतींनी ही रक्कम जमा केली आहे. उर्वरित ग्रामपंचायतींनीही वेळेत ही रक्कम जमा करावी. 
- डी. बी. गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), बीड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Repay the unspent and interest amount of Finance Commission, order of Beed ZP to Gram Panchayat