नांदेडला लोकप्रतिनिधी सरसावले...कशासाठी ते वाचा...

file photo
file photo

नांदेड ः जगभरात पसरत चाललेल्या ‘कोरोना’च्या विरोधात लढाई सुरु झाली आहे. देशभरात प्रतिबंधात्मक योजना राबविण्यात येत आहेत. नांदेडला देखील जिल्हा प्रशासनाने जमावबंदी लागू केली असून पोलिसांच्या वतीने विनाकारण कामाशिवाय बाहेर फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता कोरोनाच्या विरुद्धच्या लढ्यासाठी नांदेडमध्ये लोकप्रतिनिधीही सरसावले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २२) ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला. यास संबंध भारतभरातून नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील गर्दी टाळा, शक्यतो घरातच रहा, असे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद मिळाल्यानंतर आता नांदेडमध्ये देखील लोकप्रतिनिधींनी आवाहन करण्यासोबतच आभार मानण्यास सुरुवात केली आहे. 

कृतज्ञता भाव व्यक्त
जनता कर्फ्यूमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल तसेच कोरोनाची साथ पसरू नये म्हणून अविरत धडपड करणारे आरोग्य सेवेतील वेगवेगळे घटक, सरकारी कर्मचारी, पोलीस, प्रसार माध्यमांशी क्षेत्राशी जोडलेल्या सर्व व्यक्ती सध्या अहोरात्र कष्ट घेत आहेत. प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून झटत आहेत. या साऱ्यांबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी अनेकांनी रविवारी सायंकाळी घराच्या बाल्कनी, गच्चीवरुन टाळ्या, थाळी व घंटानाद केला. 

नेत्यांनी मानले जनतेचे आभार
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जनतेचे आभार मानले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, अशी विनंती केली आहे. दुसरीकडे भाजपचे नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत स्वतःचा जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सर्व घटकांचा उत्साह वाढविण्यासाठी खासदार चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील निवासस्थानी टाळ्या वाजवून सन्मान केला. या वेळी परिसरातील नागरिकांसह खासदार चिखलीकर, प्रतिभाताई चिखलीकर, वैशालीताई चिखलीकर आदी उपस्थित होते. 

घराबाहेर पडू नका...
भाजपचे आमदार राम पाटील रातोळीकर व त्यांच्या कुटुंबीयांनीदेखील रातोळीत (ता. नायगाव) टाळ्या वाजवून व थाळीनाद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तसेच अहोरात्र सेवा देणाऱ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त केली. माजी खासदार ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांनी देखील पत्नी ताराबाई पाटील आणि सूनबाई डॉ. मीनल पाटील खतगावकर यांच्या उपस्थितीत थाळीनाद व टाळ्या वाजवून आपतकालीन सेवा देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. भाजपचे महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी देखील कुटुंबियांसह सायंकाळी थाळीनाद करुन कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर नागरिकांनी घराबाहेर पडू नका, घरात रहा असे आवाहन केले आहे.  

मास्कचे मोफत वाटप
शिवसेनेचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, महानगरप्रमुख सचिन किसवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांनी विशेष करुन जे जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करतात असे भाजीवाले, फळवाले, स्वच्छता व साफसफाई करणारे कर्मचारी, पोलिस, आरोग्य कर्मचारी आदींना मास्कचे मोफत वाटप केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com