अहमदपूरात घरातील साहित्य वापरुन गुढीपाडवा साजरा, पोलिसांचा बंदोबस्त

रत्नाकर नळेगावकर
Wednesday, 25 March 2020

अहमदपूर शहरात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात परंतु कोरोनाच्या सतर्कतेने साजरा करण्यात आला. बुधवारी (ता.२५ ) पाडव्यानिमित्त घरोघरी मोठ्या आनंदाने गुढी उभारण्यात आली. पुजेसाठी लागणारे फुले, बताशे, संचारबंदी असल्याने नारळ अशा वस्तू सहजासहजी मिळाल्या नाहीत.

अहमदपूर (जि.लातूर) : शहरात गुढीपाडवा मोठ्या उत्साहात परंतु कोरोनाच्या सतर्कतेने साजरा करण्यात आला. बुधवारी (ता.२५ ) पाडव्यानिमित्त घरोघरी मोठ्या आनंदाने गुढी उभारण्यात आली. पुजेसाठी लागणारे फुले, बताशे, संचारबंदी असल्याने नारळ अशा वस्तू सहजासहजी मिळाल्या नाहीत. घरी असलेल्या साहित्याचा वापर करून लोकांनी मोठ्या उत्साहात व आनंदाने गुढी उभा करून मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा केला. गुढी उभी करत असताना बऱ्याच नागरिकांनी कोरोनाची सतर्कता म्हणून तोंडाला कापडी अवरण बांधले होते.

पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. शहरात बंद असल्यामुळे फक्त जीवनावश्यक वस्तू खरेदी व आरोग्य तपासणी साठीच बाहेर निघाल्याने रस्त्यावर नागरिकांची कमीच उपस्थिती होती. गावात शुकशुकाट शुकशुकाट पाहायला मिळाला.  

वाचा ः नागरिकांची सुरक्षा करणारे पोलिसच असुरक्षीत !

दरवर्षी गुढी पाडव्याला बरेच नागरिक सोन खरेदी करतात. मात्र या वर्षी बाजारपेठ बंद असल्याने कोणत्याही नागरिकांनी सोने खरेदी करणे पसंत केले नाही किंवा दूरध्वनीवरूनही मागणी केली नाही. शहरात पन्नास दुकानांच्या माध्यमातून जवळपास पंच्याहत्तर लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.
- भरत इगे, सराफा व्यापारी, अहमदपूर

दर वर्षी लोक इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक वस्तू पाडव्याच्या अगोदर आठ दिवस राखीव करतात. या वर्षी कोणतीही वस्तू लोकांनी राखीव केली नाही. पाडव्याच्या दिवशी बंद असल्याने एकही वस्तू विक्री झाली नाही. इलेक्ट्रीक व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी पूर्णपणे थांबल्यांने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
- अभिलाषा पोकरणा, मोबाइल व इलेक्ट्रीक विक्रेता, अहमदपूर

महाराष्ट्र-कर्नाटकाच्या तिन्ही सीमा केल्या बंद
उदगीर  : उदगीर तालुक्यात असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटकाच्या तिन्ही सीमा प्रशासनाने मंगळवारी (ता.२४) बंद केल्या आहेत. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही कर्नाटकाच्या नागरिकांना महाराष्ट्रात प्रवेश देण्यात येत नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ यांनी दिली आहे.राज्यात निर्माण झालेल्या कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत राज्य शासनाने सोमवारी (ता.२३) संचारबंदीचे आदेश काढून राज्याच्या सर्व सीमा बंद करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार उदगीरचे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी व उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर यांच्या आदेशाने ग्रामीणचे पोलिस निरीक्षक श्री. शिरसाठ यांनी उदगीर तालुक्यात महाराष्ट्र कर्नाटकाच्या असलेल्या जानापूर, तादळापूर या दोन सीमा, तर देवनी पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी उदगीर तालुक्यातील पण देवणी पोलीस ठाणे हद्दीतील तोगरी येथील सीमा मंगळवारपासून (ता.२४) बंद केल्या आहेत.

या सीमेवरून कर्नाटकातील नागरिकांना अत्यावश्यक करण्यासाठी जर उदगीरकडे जात असतील तर त्यांना पाठवण्यात येत आहे.अन्यथा इतर कारणासाठी राज्यात प्रवेश देणे बंद करण्यात आले आहे. सध्या प्रत्येक सीमेवर दोन पोलिस तैनात करण्यात आले असून लातूरच्या मुख्यालयाचे अजून दोन पोलिस सीमेवर दाखल होणार असल्याचे पोलिस निरीक्षक श्री. शिरसाठ यांनी सांगितले.

आरोग्य तपासणी अनिवार्य
या सीमा भागातून महाराष्ट्रात अत्यावश्यक कारणासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी बुधवारपासून (ता.२५) करण्यात येणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाचे पथक पोलिसबरोबर काम करणार आहे. जर संसर्गजन्य पार्श्वभूमी आढळल्यास त्यांना तात्काळ आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे श्री. शिरसाठ यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Residents Celebrate Gudhi Padwa, Ahmadpur