वंचित’च्या बंदला नांदेडमध्ये प्रतिसाद

शिवचरण वावळे
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

देश वाचवा, स्वतःला वाचवा, वाचा - विचार करा, जागे व्हा... असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी सीएए, एनआरसी, एनपीए विरोधात शुक्रवारी (ता. २४) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला नांदेडमध्ये प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच बंद पाळण्यात आला.

नांदेड - सीएए, एनआरसी, एनपीआर या सारखे कायदे आणून देशातील नागरिकांना वेठीस धरले जात आहे. या गोंधळात सरकारने कंपन्या विकायला काढल्या आहेत. सरकारी मालकीच्या आस्थापना कवडीमोल भावाने खासगी मालकांना विकत आहेत. या सगळ्यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने विरोध करणे, हा एकमेव मार्ग असल्याने वंचित बहुजन आघाडीतर्फे बंदचे आवाहन करण्यात आले होते.

देश वाचवा, स्वतःला वाचवा, वाचा - विचार करा, जागे व्हा... असे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी सीएए, एनआरसी, एनपीए विरोधात शुक्रवारी (ता. २४) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला नांदेडमध्ये प्रतिसाद मिळाला. नांदेड शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारलेल्या या बंदला व्यापारी, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, तसेच आॅटोरिक्षा व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने प्रतिसाद मिळाला. त्यामुळे बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी निर्दशने करण्यात आली.

हेही वाचा- राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत ठाणे अव्वल

अनेकांनी घेतला सहभाग
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे फारुख अहेमद, भारिप बहुजन महासंघाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ. संघरत्न कुऱ्हे, भारिप बहुजन महासंघाचे नांदेड उत्तर महासचिव श्याम कांबळे, शहर महासचिव अशोक कापसीकर, तालुकाध्यक्ष विठ्ठल गायकवाड, संघटक दीपक कसबे, उपाध्यक्ष साहेबराव थोरात, प्रा. साहेबराव बेळे, उन्मेश ढवळे, आयुब खान, सुनील सोनसळे, सम्यकचे अध्यक्ष संदीप वने, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन बनसोडे, दैवशाला पांचाळ, जया कोकरे, जयदीप पैठणे, केशव थोरात, रामचंद्र येईलवाड, प्रशांत इंगोले, राजेश रापते, कौशल्या रणवीर, प्रशांत गोडबोले, भारिपचे पद्माकर सोनकांबळे, सोंडारे, डॉ. भेदे, सम्यकचे भीमराव कांबळे, हणमंत सांगळे, डॉ. अजिंक्य गायकवाड, रामचंद्र भरांडे आदींचा सहभाग होता.

या संघटनांनी दिला बंदला पाठिंबा
या बंदला रिपब्लिकन सेना, लोकस्वराज्य आंदोलन, सर्वपक्षीय आंदोलन, आॅल इंडिया इमाम कॉन्सिल, नांदेड प्रोग्रोसिव्ह बार असोसिएशन, जमेतुलमा असोसिएशन, संविधान बचाव कृती समिती, नांदेड ह्युमन राईट संघटना, युथ ब्रिगेड, मायनॉरिटी डेव्हलपमेंट असोसिएशन, वायएसएफ जिल्हा नांदेड, सुराज्य श्रमिक सेना, युवा पँथर यांच्यासह अनेक संघटनांनी वंचितच्या सीएए, एनआरसी, एनपीए विरोधात जाहीर पाठिंबा देत बंदमध्ये सहभाग घेतला.

हेही वाचलेच पाहिजे - विभागीय आयुक्तांनी घेतला अधिकाऱ्यांचा वर्ग

सर्व स्तरातून पाठिंबा
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला शहरातील अत्यावश्यक सेवा सुविधा वगळता सर्व स्तरातून पाठिंबा मिळला. त्यामुळे शहरातील मोठ्या रस्त्यावरही शुकशुकाट दिसून येत होता. अनेक दुकाने व मोठी व्यापारी संकुले बंद ठेवण्यात आली होती. शहरातील बहुतेक शाळा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना सुटी दिल्याने एरवी विद्यार्थ्यांच्या गर्दीनी फुलुन जाणारे शहरातील शाळा - महाविद्यालय व खासगी शिकवणी वर्गाचे परीसर आज विद्यार्थ्यांविना सुने - सुने वाटत होते.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Responding to the deprived bandh in Nanded