वर्षभरात रस्ते अपघातात 290 जणांचा मृत्यू, लातूर जिल्ह्यातील चित्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जानेवारी 2020

लातूर जिल्ह्यात 2018 मध्ये 633 अपघात होऊन 246 जणांचा मृत्यू, तर 2019 मध्ये 641 अपघात होऊन 290 जणांचा मृत्यू झालेला आहे. 2019 च्या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये मोटारसायकल- 183 मृत्यू, पादचारी- 57 मृत्यू, चारचाकी- 61 मृत्यू, ट्रक- 51 मृत्यू, बस- 22 मृत्यू, अनोळखी वाहन- 19 व ट्रॅक्‍टर- 18 मृत्यू असे प्रमाण असून 21 ते 30 वयोगटातील लोकांचे अपघातातील मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी दिली.

लातूर ः जिल्ह्यात रस्ते अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. 2019 या वर्षभरात जिल्ह्यात 641 अपघात झाले. यात 290 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 21 ते 30 या वयोगटातील तरुणांचा समावेश अधिक आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहन चालवत असताना किती काळजी घेतली पाहिजे, हे यावरून दिसून येत आहे. यासंदर्भात जनजागृती व्हावी, याकरिता सोमवारपासून (ता.13) रस्ता सुरक्षा अभियानाला सुरवात करण्यात आली आहे.

येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्‌घाटन अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी अमर पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे, महापालिका उपायुक्त संभाजी वाघमारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, राजेश्वरी गुंड, एस.टी. महामंडळाचे विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर, वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव शिंदे, उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे उपस्थित होते.

हेही वाचाअंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद

लातूर जिल्ह्यात 2018 मध्ये 633 अपघात होऊन 246 जणांचा मृत्यू, तर 2019 मध्ये 641 अपघात होऊन 290 जणांचा मृत्यू झालेला आहे. 2019 च्या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये मोटारसायकल- 183 मृत्यू, पादचारी- 57 मृत्यू, चारचाकी- 61 मृत्यू, ट्रक- 51 मृत्यू, बस- 22 मृत्यू, अनोळखी वाहन- 19 व ट्रॅक्‍टर- 18 मृत्यू असे प्रमाण असून 21 ते 30 वयोगटातील लोकांचे अपघातातील मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी पाटील यांनी दिली.जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सुमारे 300 जणांचा मृत्यू रस्ते अपघातात झालेला आहे. ही संख्या रस्ते वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याचे निर्देशक आहे. सर्व वाहनचालकांनी रस्ते सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करावे. अपघातात मृत्यू झालेल्या त्या 300 कुटुंबांकडे पाहावे, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले.

येथे क्लिक कराकायद्याचे अज्ञान हा गुन्हेगारीमधून सुटण्याचा मार्ग नाही- न्या. धोळकिया

अपघात झाल्यानंतर सुरवातीलाच अपघातग्रस्तांना तत्काळ मदत मिळणे अत्यंत गरजेचे असते. अशावेळी सर्व संबंधित नागरिकांनी अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करावी. पोलिस प्रशासनाकडून अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला चौकशीसाठी बोलविले जाणार नाही व कोणताही नाहक त्रास दिला जाणार नाही, असे श्री. जाधव यांनी सांगितले. यानिमित्ताने प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना असलेल्या वाहतूक नियमावली पॉम्प्लेटचे विमोचन करण्यात आले; तसेच वाहनांमध्ये ठेवण्यासाठी प्रथमोपचार कीट ही प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले. यावेळी कामाण्णा गुणवंत काशीनाथ (उदगीर), युवराज धनराज कांबळे (निलंगा) व दत्तू शंकर बिराजदार (निलंगा) या बसचालकांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले. श्रीमती पवार यांनी सूत्रसंचालन केले. राजेश्वरी गुंड यांनी आभार मानले.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road Accident Claims 290 Lives Latur District