... येथील रस्ते गर्दीने फुल्ल 

संजय बर्दापुरे
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

- शहराबाहेर जाणारे रस्त्यांवर नागरिकांची गर्दी
-पोलिस, सैन्य भरतीसाठी सराव करणाऱ्यांचा समावेश
- मॉर्निंग वॉक करताना संगीताची वाजतेय धून 
-रस्त्यांवर अंधार पसरत असल्याचे पथदिव्यांची आवश्यकता

वसमत(जि. हिंगोली): 'आला हिवाळा, तब्‍येत सांभाळा' या उक्‍तीचे अनुकरण करण्यासाठी शहरातील ज्‍येष्ठ नागरिकांसह महिला, युवक, युवतींसह बच्‍चे कंपनी मॉर्निंग वॉकसाठी शहराच्‍या विविध रस्‍त्‍यावर गर्दी करताना दिसत आहेत. तसेच रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर यांच्‍या योगाभ्यासाच्‍या शिबिरांनाही प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्‍हणजे मॉर्निंगवॉक करतानाही अनेकजण मोबाइलवर हिंदी, मराठी, नवे-जुणे गाण्यासह भजनसंध्या, गणपती स्‍त्रोत्रांचा मनमुराद आनंद लुटतांना दिसून येत आहे. 

नियमाप्रमाणे हिवाळा ऋतू सुरू झाला आहे. परंतु, ऋतू बदल झाल्‍यानंतरही फारसी थंडी जाणवत नाही. नागरिकांनी मात्र ‘आला हिवाळा, तब्‍येत सांभाळा’ म्‍हणत सुकामेव्याच्‍या सेवनाबरोबर मॉर्निंगवॉकला सुरूवात केली आहे. पहाटे पाच वाजेपासून असेगाव रस्‍ता, मुडी रस्‍ता, मालेगांव रस्‍ता, योगानंद कॉलेज रस्‍ता, दगडगांव रस्‍ता नागरिकांच्‍या गर्दीने फुलून जात आहे. यात पोलिस, सैन्‍य भरतीसाठी सराव करणाऱ्या तरूण-तरूणींचा समावेश असलेला पहावयास मिळत आहे. तसेच वयोमानानुसार आरोग्‍याच्‍या समस्‍या उद्भवलेल्‍या ज्‍येष्ठांची रिघ सुरू झाली आहे. योग गुरू रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर यांच्‍या योगाभ्यास शिबिरालाही शहरातील पुरूष व महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. मॉर्निंगवॉक बरोबरच शहरातील शाळा, महाविद्यालयाच्या मैदानांवर कबड्डी, बॅडमिंटन, कुस्‍ती, क्रिकेट, फुटबॉल, खो-खो आदी खेळ खेळतांना विद्यार्थी, विद्यार्थींनी खेळाडू सराव करताना दिसून येत आहेत. 

सकाळच्या वेळी गुंजतेय संगीताची धून

मॉर्निंगवॉकला निघालेल्‍या नागरिकांकडून वयोमानानुसार नवे -जुने हिंदी, मराठी, गाण्यासह लावणी, कोळीगीत, भक्तीगीत वाजताना दिसून येत आहेत. लोकसंगीताचाही मनमुराद आनंद लुटताना नागरिक दिसत आहेत. विशेष म्‍हणजे तरूणांमध्ये विविध अल्‍बम संगीताचा फॅड दिसत आहे. तर भजन विविध देवतांचे स्‍त्रोत्रही भाविक मोबाइलवर ऐकात आहेत.

पथदिवे बसविण्याची गरज

पहाटे चार वाजल्‍यापासून शहरातून बाहेर जाणाऱ्या विविध रस्‍त्‍यावर नागरिकांची गर्दी असते. पहाटे चार ते सकाळी सहा वाजेपर्यंत अंधार पसरलेला असतो. अंधार पसरलेल्याच रस्‍त्‍यावरून नागरिकांना धावत जावे लागत आहे. शहराच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर दिवे बसवावेत, अशी मागणी संदिप सुर्यवंशी यांनी केली आहे. 

पोलिसांचा वॉच आवश्यक

पहाटेच्या सुमारास पुरूष, महिला नागरिकांबरोबरच मॉर्निंगवॉकसाठी, खेळासाठी व पोलिस भरतीच्‍या सरावासाठी मोठ्या प्रमाणात तरूणी, विद्यार्थीनी बाहेर पडतात. त्यामुळे पोलिसांनी पथक निर्माण करून शाळा, महाविद्यालय येथील मैदाने तसेच विविध रस्‍त्‍यांवर वॉच ठेऊन संरक्षण देण्याची गरज आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The roads here are full of crowds