मंकावती तीर्थकुंड हडप केल्याप्रकरणी रोचकरी बंधूंना पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस कोठडी

मंकावती तीर्थकुंड हडप केल्याप्रकरणी रोचकरी बंधूंना पोलिस कोठडी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजापूर (Tuljapur) शहरातील मंकावती तीर्थकुंड हडप (Mankawati Thirthkund Encroachment) केल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी आणि त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांना येत्या सोमवारपर्यंत (ता.२३) पोलिस कोठडी देण्याचा आदेश येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.१९) दिला आहे. येथील तुळजाभवानी मंदिराजवळ (Tuljabhavani Mata Temple) असणाऱ्या मंकावती तीर्थ कुंड हडप करण्याच्या प्रकरणी माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी आणि त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. देवानंद रोचकरी यांना बुधवारी (ता.१८) मुंबई येथे मंत्रालयाजवळ उस्मानाबाद (Osmanabad) पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी हे गुरूवारी (ता.१९) पहाटे पोलिसांकडे हजर झाले होते. माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांना मुंबई येथे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना तुळजापूर पोलिस ठाण्यात अटक दाखवण्यात आली.

हेही वाचा: काढणीस आलेली केळीची बाग माथेफिरुने कापली, शेतकरी आर्थिक संकटात

त्यानंतर माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी आणि त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पोलिसांनी गुरूवारी हजर केले. सदर मंकावती तीर्थकुंड हडप केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. तसेच मंकावती तीर्थकुंड हे प्राचीन तीर्थकुंड आहे. यासंदर्भात गुन्ह्याचा प्रकार गंभीर असल्याने पोलिस कोठडी मिळावी अशी विनंती न्यायालयासमोर करण्यात आली. गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास रोचकरी बंधूना न्यायालयात आणण्यात आले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिस कोठडी देण्याचा आदेश दिला आहे. दरम्यान माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांना न्यायालयात हजर करण्यासाठी आणल्यानंतर न्यायालयाच्या बाहेर श्री.रोचकरी यांचे समर्थक आले होते. दुचाकी आणि चारचाकी वाहने घेऊन त्यांचे समर्थक आले होते. पोलिस निरीक्षक आदिनाथ काशीद हे तपास करित आहेत.

टॅग्स :Tuljapur