काढणीस आलेली केळीची बाग माथेफिरुने कापली, शेतकरी आर्थिक संकटात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्धापूर (जि.नांदेड) तालुक्यातील शेनीत अज्ञात माथेफिरूने शेतकऱ्याची काढणीस आलेली केळीची बाग कापली.

काढणीस आलेली केळीची बाग माथेफिरुने कापली, शेतकरी आर्थिक संकटात

अर्धापूर (जि.नांदेड) : वर्षभर जीवाप्रमाणे जपलेल्या व काढणीस आलेल्या केळीच्या बागेवर (Banana Crops) कत्ता चालवून सुमारे एक हजार झाडे कापून दोन लाख रूपयांचे नुकसान बुधवारी मध्यरात्री (ता.१८) केले.अल्पभूधारक (Marginal Farmer) शेतकरी नामदेव माधवराव धात्रक (रा.शेनी) (Ardhapur) यांचा हातातोंडाशी आलेला घास अघोरी कृत्यामुळे हिरावून गेल्याने स्वप्न भंगले आहे. अशाच घटना या परिसरात दहा ते बारा झाल्या असून अद्याप एकाही घटनेचा शोध लावण्यास अर्धापूर यश (Nanded) आले नाही. या घटनेप्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शेनी येथील ग्रामस्थांनी आरोपींचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन दिले. शेनी येथील शेतकरी नामदेव माधवराव धात्रक यांच्याकडे तीन एकर शेती आहे. केळीच्या बागेतून चार पैसे बाजूला ठेवून कुटूंबाचा उदरनिर्वाह व्हावा. यासाठी गेल्या वर्षी त्यांनी शेनी शिवारातील शेतात एक एकरमध्ये केळीची लागवड केली होती.

हेही वाचा: शासनाने निर्णय घ्यावा!अन्यथा शाळा सुरु करु, हरिभाऊ बागडेंचा इशारा

शेती कमीच असल्यामुळे पती-पत्नी यांनी कष्ट व जिद्दीने कडक उन्हात केळीचे संगोपन केले. केळीची बाग काढणीस आल्यामुळे कुटूंबात आनंदाचे वातावरण होते. पण अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने सपासप वार करून आख्खी बागच एका रात्रीतून उद्ध्वस्त केली. शेतकरी हे गुरुवारी (ता.१९) सकाळी शेताकडे गेले असता उद्ध्वस्त बाग पाहून धक्काच बसला. अज्ञात माथेफिरूच्या अघोरी कृत्यामुळे सुमारे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यांनी अर्धापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक जाधव, पोलिस उपनिरीक्षक बळीराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार पप्पू चव्हाण, संजय घोरपडे हे करित आहेत. मी गेल्या वर्षभरात केळीची बाग जीवाप्रमाणे जतन केली. या बागेतून चार पैसे उरतील अशी आशा होती.

हेही वाचा: पाच चविष्ट मिठाई, सोपे अन् झटपट घरच्या घरी बनवा

बाग काढणीस आल्यामुळे गुरुवारी व्यापाऱ्याला केळीचे झाड देण्याचे ठरले होते. पण घटनेच्या अदल्या रात्री अज्ञात माथेफिरूनी बाग कापून आशेवर पाणी फिरवले आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी नामदेव धात्रक यांनी दिली आहे. या परिसरात अशा घटना घडत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. लाखो रूपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान पोलिस उपनिरीक्षक बळीराम राठोड, जमादार पप्पू चव्हाण, संजय घोरपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. अशा घटनांना आळा घालण्यासाठी गावोगाव ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनी दिली.

टॅग्स :Nanded