Success Story: मजुरी करणाऱ्या आईवडिलांच्या कष्टाचे लेकीने केले सोने; मेहनत, जिद्दीच्या जोरावर झाली फौजदार

सयाजी शेळके
Sunday, 7 March 2021

नायगावचे (ता.कळंब) धनराज नरसिंगे यांना चार मुली. शेती नसताना पती, पत्नी दोघेही रोजंदारीवर काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत असत.

नायगाव (जि.उस्मानाबाद) : येथील मजुरी करणाऱ्या कुटुंबातील रोहिणी नरसिंगे ही पोलिस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण पूर्ण करून पोलिस प्रशासनाच्या सेवेत दाखल होणार आहे. 2018 च्या लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत तिने चौथ्या प्रयत्नात यश प्राप्त केले होते. रोहिणीने प्रतिकुल परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर फौजदार होण्याचा पल्ला गाठला आहे. शिक्षण सुरू असतानाच तिला परिस्थितीमुळे मजुरीचे काम कराव लागत होतं.

हेही वाचा - 'मराठवाड्यातील मराठा समाजाचा ओबीसीत समावेशासाठी सर्वोच्च न्यायलयात हस्तक्षेप याचिका दाखल'

बिकट कौटुंबिक स्थिती
नायगावचे (ता.कळंब) धनराज नरसिंगे यांना चार मुली. शेती नसताना पती, पत्नी दोघेही रोजंदारीवर काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवत असत. अशा परिस्थितीत त्यांनी चारही मुलींचा सन्मानाने सांभाळ केला. खडतर परिस्थितीतून त्यांनी मुलींना शिक्षणासाठी बळ दिले. मजुरीच्या पैशातून कुटुंबाच्या गरजा भागत नसल्याने लहान वयातच वेळप्रसंगी रोहिणीने घरखर्चासाठी मजुरीही केली. रोहिणीला पदवीचे शिक्षण झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न होते. अनेक संकटांना समोरे जात तिने स्वप्न पूर्णही केले.

हेही वाचा - बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे महाशिवरात्री महोत्सव रद्द

शिक्षक होण्यासाठी डी.एड.ही
12 वीनंतर तिने शिक्षक होण्यासाठी डी.एड.ही केले. परंतू ध्यास फौजदार होण्याचा होता. त्यादृष्टीने कला शाखेत पदवी घेतल्यानंतर तिने पोलिस उपनिरीक्षक पदासाठी एमएसपीसीचा अभ्यास सुरू केला. दोन परीक्षा झाल्या, तिसरीही परीक्षा झाली तरी अपयश काही पाठ सोडत नव्हते. परंतू या अपयशाने खचून न जाता. आता शेवटचा प्रयत्न म्हणून तिने 2018 मध्ये चौथा प्रयत्न केला. यात मात्र तिने यश प्राप्त करीत आपले स्वप्न सत्यात उतरविले. या यशाने आई, वडिलांना मोठा आनंद झाला. सध्या रोहिणीचे नाशिक येथे पोलिस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून तिला पोस्टिंग मिळण्याच्या प्रतिक्षेत आहे.

हेही वाचा -  दुर्दैवी! उमरगा बायपासवर भरधाव ट्रकने १५ शेळ्या-मेंढ्यांना चिरडले; महिलांना दुःख अनावर, फोडला हंबरडा

परिस्थितीने शिकविले
परिस्थिती हालाखीची असल्याने, ध्येय व जिद्द आणि कष्टाने या परिस्थितीवर मात करायचे शिकले. आई, वडिलांचे बळ आणि प्रोत्साहन यामुळे यशाला गवसणी घालू शकले अशा भावना रोहिणी नरसिंगे हिने व्यक्त केल्या.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohini Narsinge Become PSI In Adverse Family Condition Nayagaon Osamanabad News