सलाईनचे स्टॅन्ड घेवून कोविड रुग्ण परिचारिकेच्या खोलीकडे; परभणी कोविड सेंटरमधील प्रकार

गणेश पांडे
Wednesday, 7 April 2021

एका रुग्णाने सलाईन वेळेवर दिले जात नाही म्हणून सलाईनचे स्टॅन्ड घेवून परिचारिकेच्या खोलीकडे मोर्चा वळविला. यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

परभणी ः येथील जिल्हा परिषदेच्या नुतन इमारतीमधील कोविड सेंटरमध्ये रुग्णावर योग्य पध्दतीने उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. बुधवारी (ता.सात) याच कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाने सलाईन वेळेवर दिले जात नाही म्हणून सलाईनचे स्टॅन्ड घेवून परिचारिकेच्या खोलीकडे मोर्चा वळविला. यामुळे काही काळ या ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

परभणी येथील जिल्हा परिषदेच्या नुतन इमारतीमध्ये सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरमधील गलथान कारभाराचे एक - एक किस्से आता बाहेर येत आहेत. या ठिकाणी असलेले कर्मचारी रुग्णाकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रुग्णांना वेळेवर औषधी दिली जात नाहीत. पाणी नाही, खिडक्यांना पडदे नाहीत असे एक ना अनेक प्रकार आता बाहेर येवू लागले आहेत. बुधवारी (ता.सात) या कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाला सकाळपासून सलाईन दिले गेले नसल्याची तक्रार या रुग्णाने वेळोवेळी केली. परंतू त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याने अखेर वैतागलेल्या सदरील रुग्णाने सलाईनचे स्टॅन्ड सोबत घेवून परिचारिकांच्या खोलीकडे मोर्चा वळविला. या ठिकाणी त्यांनी परिचारिकांना मला सलाईन लावून द्या असी वारंवार विनवनी केली. परंतू त्याच्या मागणीकडे कुणीच लक्ष दिले नसल्याची तक्रार या रुग्णाने केली आहे. या संदर्भात एक व्हिडिओ बुधवार दुपारपासून सोशल मिडियावर फिरत होता. या व्हिडिओमध्ये हा रुग्ण मला योग्य पध्दतीने उपचार दिल्या जात नसल्याची तक्रार केली आहे. कोणत्याही रुग्णांकडे काळजी पूर्वक पाहिले जात नाही असे ही रुग्णांचे म्हणने होते.

हेही वाचारेणुका देवी गडावर भीषण अग्नितांडव; मंदिर संस्थान व 125 व्यापारी प्रतिष्ठाने बचावली

कोविड रुग्णांचे अतोनात हाल
जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पिण्यासाठी पाणी नाही, खिडक्यांना पडदे नाहीत. बेडवर चादर नाही असे एक ना अनेक किस्से या कोविड सेंटरमध्ये पहावयास मिळत आहेत. दररोज एक नवीन किस्सा या सेंटरमधून बाहेर पडत आहे. फोटो व व्हिडिओच्या माध्यमातून हे सोशल मिडियावर व्हायरल केले जात आहेत. असे असतांनाही या कोविड सेंटरमधील रुग्णांच्या मागण्याकडे कुणाचेही लक्ष नाही हे मात्र विशेष आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To the room of the covid nurse, taking a stand of saline; Types in Parbhani Covid Center