अख्ख्या गावाने डावलले, पण बॅंकेने केले महिलेवर अंत्यसंस्कार

युवराज धोतरे
Tuesday, 8 September 2020

चोंडी (ता.उदगीर) येथील एका पंचावन्न वर्षीय महिलेचा आकस्मिक मृत्यू झाला. कोरोनाच्या दहशतीने अख्या गावातील एकही जण अंत्यविधीसाठी पुढे आला नाही. या महिलेच्या पतीने शहरातील रोटी कपडा बँकेला मदत मागितली. या बँकेच्या टिमने गावात जाऊन अंत्यसंस्कार केल्याने या कुटुंबाला धीर आला.

उदगीर (जि.लातूर) : चोंडी (ता.उदगीर) येथील एका पंचावन्न वर्षीय महिलेचा आकस्मिक मृत्यू झाला. कोरोनाच्या दहशतीने अख्या गावातील एकही जण अंत्यविधीसाठी पुढे आला नाही. या महिलेच्या पतीने शहरातील रोटी कपडा बँकेला मदत मागितली. या बँकेच्या टिमने गावात जाऊन अंत्यसंस्कार केल्याने या कुटुंबाला धीर आला. अख्ख्या गावाने डावललेल्या महिलेच्या मृतदेहावर रोटी कपडा बँकेने अंत्यसंस्कार करून आधार दिला आहे.

Breaking : जालन्यात सहायक पोलिस फौजदाराची गोळी झाडून आत्महत्या

चोंडी येथे राहणारे एक गरीब कुटुंब. कुटूंबात नवरा-बायको व एक मुलगी. अचानक या कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला. सध्या कोरोना संसर्गजन्य परिस्थिती असल्याने सगळीकडेच वातावरण भयभीत झाले आहे. मात्र या कुटुंबातील कोणालाही कोरोनाची लागण झाल्याचा आवाज आलेला नव्हता. अशा परिस्थितीत सांत्वन करण्यासाठी तर सोडाच पण अंत्यविधीसाठी गावातील कोणीही जवळ आले नाही.

एवढे मोठे दुःखाचे डोंगर समोर असताना या कुटुंबातील व्यक्तींकडे अंत्यसंस्कार करायचे कसे? हा प्रश्न पडला. हा प्रश्न पैसे देऊन किंवा इतर काही करूनही मिटणार नव्हता. यासाठी माणसांचीच मदत लागणार होती. मात्र आयुष्यभर गावात राहून गावातील माणसांनीच पाठ फिरवल्याने फार मोठे संकट या कुटुंबावर निर्माण झाले होते. या परिस्थितीमध्ये कोणीतरी या व्यक्तीला उदगीरच्या रोटी कपडा बँके विषयी माहिती देऊन मदत करण्याची विनंती करण्याचा सल्ला दिला.

आज होणार उदगीर पंचायत समितीच्या नव्या सभापतीची निवड

त्यानुसार या व्यक्तीने रोटी कपडा बँकेच्या गौस शेख यांच्याशी संपर्क केला व त्यांना अशी परिस्थिती निर्माण झाली असून आपण अंत्यसंस्कार करावेत अशी विनंती केली. उदगीर शहरात अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक प्रेतावर या रोटी कपडा बँकेच्या युवकानी अंत्यसंस्कार केले होते.

या बँकेच्या युवकांनी त्यांना लगेच होकार देऊन सोमवारी (ता.सात) रात्री चोंडी येथील सार्वजनिक स्मशान भूमीत या महिलेवर अंत्यसंस्कार केले.या अंत्य विधीकडे ग्रामस्थानी फिरकूनही पाहिले नसल्याचे श्री शेख यांनी यावेळी सांगितले. या अंत्यसंस्कारासाठी बेघर निवारा केंद्र चालवणाऱ्या `सलात' (रोटी कपडा बँक) या संस्थेच्या गौस शेख, समीर शेख, जावेद शेख अमजद मणियार, कलीम शेख, अखिल शेख आदीयुकांचा या टिममध्ये समावेश आहे.

लातुरात शिवभोजन थाळीची पार्सल सेवा जोरात,सव्वातीन लाख जणांची भागवली भूक

जाती धर्मापलीकडचा अंत्यसंस्कार
बेघर निवारा केंद्र चालवणाऱ्या `सलात' (रोटी कपडा बँक) या संस्थेचे अंत्यसंस्कार करणारे सर्व युवक हे विशेष करून मुस्लिम धर्मातील आहे. या युवकांनी गावाने झिडकारले असतानाही पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार केला. हे अंतिम संस्कार म्हणजे जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन केलेला माणुसकीचा अंत्यसंस्कार ठरला.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roti Kapda Bank Completes Rituals On Woman Udgir News