गरिबांची अशीही थट्‌टा... बीडमध्ये सडका गहू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

स्वस्त धान्य दुकानावरून दारिद्य्र रेषेखालील लाभार्थींना चक्क सडलेला गहू वितरीत केला जात असल्याचा प्रकार बीड शहरात उघड झाला आहे.

बीड : स्वस्त धान्य दुकानावरून दारिद्य्र रेषेखालील लाभार्थींना चक्क सडलेला गहू वितरीत केला जात असल्याचा प्रकार बीड शहरात उघड झाला आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीतील प्रकाराकडे पुरवठा विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दारिद्य्र रेषेखालील लाभार्थींना सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानांतून रास्त दरात लाभार्थीनिहाय गहू उपलब्ध करुन दिला जातो. मात्र, शासनाने ठरवून दिलेल्या भावापेक्षा अधिक दराने दुकानदारांकडून याची विक्री होते. त्यातच मोठ्या प्रमाणावर स्वस्त धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचे प्रकारही घडत आहेत.

आता कहर म्हणजे स्वस्त धान्य दुकानावरून या लाभार्थींना उपलब्ध होत असलेला गहू इतका सडका आहे की तो जनावरेही खाणार नाहीत असा आरोप केला जात आहे. याबाबत पुरवठा विभागाकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप सय्यद इलयास, आमिर शख, सलमान खान, जुनैद खान, अरबाज पटेल, नदीम शेख, नदीम कुरैशी, मोमिना आमेर, मोमिन सुफियान, मोमिन जीशान, मोमिन सिद्धीक, शाहरुख कुरेशी यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rotten wheat in beed