Loksabha 2019 : आमच्या जागा कमी होतील - रामदास आठवले

Ramdas Athwale
Ramdas Athwale

लातूर : मागील निवडणूकीत जशी आमची हवा होती तशी यंदा नाही, असे अनेकजण म्हणत आहेत. पण आम्हाला तसे वाटत नाही. पण एक खरे आहे की मागील निवडणूकीत जेवढे मताधिक्य आम्हाला मिळाले होते तेवढे यंदा मिळणार नाही. काही जागा कमी होतील. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होतील. मते घटण्याचे कारण काय, या प्रश्नाला ‘आम्ही कामे भरपूर केली’, असे उत्तर देत बगल दिली. लातूरची जागा तर शंभर टक्के आम्हालाच मिळणार आहे. याशिवाय, महाराष्ट्रात ३७ ते ३८ जागा आम्हाला मिळतील, असा अंदाज केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.

आठवले म्हणाले, निवडणूका, प्रचार, आचारसंहिता यामुळे दुष्काळाचा दौरा करता आला नाही; पण आता मुख्यमंत्र्यांनी तातडीने दुष्काळी भागाची पाहणी करावी. नुसता पाहणी दौरा करून चालणार नाही, त्याबरोबरच दुष्काळग्रस्तासाठी केंद्राकडून आलेली मदतही लवकरात लवकर द्यायला हवी. दुष्काळग्रस्तांचे सरसकट वीजबिल माफ करायला हवे.

माणसांबरोबरच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही सोडवावा लागेल, लातूर जिल्ह्यातील जयनगर (ता. औसा) या गावातील दुष्काळाची पाहणी करून आठवले हे उद्या (ता. १२) शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आठवले म्हणाले, गेली काही दिवस मी दुष्काळी भागाचा दौरा करत आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे, सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अशा काळात त्यांना मदतीचा हात देणे, त्यांच्या पाठीशी राहणे  गरजेचे आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना भेटून केंद्राकडून आलेली मदत तातडीने दुष्काळग्रस्तांना द्या, असे सांगणार आहे. अनेक गावांत दुष्काळ असून जाचक नियमांमुळे ते दुष्काळग्रस्ताच्या यादीत आली नाहीत. त्यामुळे जुने निकष बदलण्याचीही गरज आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधून घेतले.

मग कमळाचे मत घड्याळाला
घड्याळासमोरील बटण दाबले की कमळाला मत जाते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच केला. यावर मिस्किल शैलीत आठवले म्हणाले, ‘‘आम्हाला काही लोक भेटले. ते म्हणू लागले, कमळासमोरील बटण दाबले की घड्याळाला मत जात आहे.’’ एखादी दुसरी मशिन खराब असू शकते. पण सगळ्याच मशिन बिघडलेल्या नसतात. पवारसाहेबांचे माझे माझे अतिशय जवळचे संबंध आहेत. पण त्यांना आता बारामतीची जागा हलणार, याची भीती वाटू लागली आहे, हे दिसून येत आहे, अशी टिपण्णीही त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com