ऊस वाहतूक वाहनांसाठी हवी नियमावली, सुरक्षिततेसाठी उपाययोजनांची व्हावी अंमलबजावणी

Umarga
Umarga

उमरगा (जि.लातूर) : साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ऊसतोड करून सर्व मार्गावर ऊसाची वाहतूक सुरू आहे. मात्र क्षमतेपेक्षा अधिक ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा धोका वाढला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनाच्या पाठीमागे अथवा बाजूला कोणत्याही उपाययोजना नसल्याने अपघाताचे प्रकार वाढताहेत. दरम्यान दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्गावर ऊसाने भरलेल्या उभ्या असलेल्या ट्रॉलीवर बस आदळून पाच जण जखमी झाले होते. तालुक्यासह अन्य भागातील साखर कारखान्याला विविध भागातील शेतातून ऊस वाहतूक जोरात चालू आहे. उसाची वाहतूक ही ट्रॅक्टर, ट्रक आणि बैलगाडीच्या माध्यमातून केली जाते.

ऊस वाहतूक करत असताना त्या वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त ऊस बऱ्याच वेळा भरलेला दिसतो. उसाची वाहतूक करत असताना ट्रॅक्टरच्या पाठीमागे कधी एक ट्रॉली असते तर कधी दोन ट्रॉली असतात. ही ऊस वाहतूक करत असताना समोरून येणाऱ्या गाडीला फक्त ट्रॅक्टर दिसते. परंतु, त्या ट्रॅक्टरच्या पाठीमागे असलेल्या ट्रॉलीवर कोणतेच इंडिकेटर नसल्याने अचानक फसगत होते. बऱ्याचदा वाहनांच्या एकदम जवळ आल्यावर त्या ट्रॉली दिसतात आणि मग घाईगडबडीत वाहन चालकाला अपघात रोखण्यासाठी धांदल उडते.

ट्रॅक्टरच्या पाठीमागून येणाऱ्या वाहनाची सुध्दा तीच अवस्था होते. ट्रॅक्टरच्या पाठीमागे असलेल्या ट्रॉलीवर कोणतेही इंडिकेटर नसल्याने बरेच आपघात घडत आहेत. कधी कधी ट्रॅक्टर अचानक बंद पडतो. मग तो ट्रॅक्टर रात्रभर रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला थांबून ठेवला जातो. ट्रॅक्टर बंद असल्याने त्यावरती कोणतेच इंडिकेटर नसल्याने अंधारात ट्रॅक्टर रस्त्यावर असलेले दिसत नाही आणि त्यामुळे बरेच वाहने येऊन त्या बंद असलेल्या ट्रॅक्टरला धडकतात. यामुळे सुद्धा बरेच अपघात घडतात.


ट्रॅक्टरवर लावलेले स्पीकर खूप मोठ्याने वाजवले जातात. त्यामुळे ट्रॅक्टरच्या पाठीमागे काय घडते याचा वाहन चालकाला अंदाज येत नाही. उसाची वाहतूक रात्रभर चालूच असते आणि स्पीकर मोठमोठ्याने चालूच असल्याने रस्त्याकडील गावातील लोकांची झोपमोड सुद्धा होते. अंधारात बैलगाडीने सुद्धा ऊस कारखान्याला घेऊन जातात. ऊसाने भरलेली बैलगाडी अंधारात जात असताना समोरून आणि पाठीमागून येणाऱ्या वाहनांना  बैलगाडी दिसत नाही. नजीकच्या काळात अपघात होऊ नयेत. यासाठी आरटीओ प्रशासनाने तातडीने ऊस वाहतूक करणाऱ्या सर्वच वाहनासाठी नियमावली तयार करून त्याची काटेकोरपणे अमलबजाणी होण्यासाठी आवश्यक आहे.


नजीकच्या काळात अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने ऊस वाहतूक करणाऱ्या सर्वच वाहनासाठी नियमावली तयार करून त्याची काटेकोरपणे अमलबजाणी होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.
- प्रदीप बालकुंदे, नागरिक, कडदोरा

घर मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असल्याने रात्रभर इथून उसाची वाहतूक होते आणि वाहनांवर मोठमोठ्याने वाजवले जाणाऱ्या स्पीकरमुळे त्रास होतो.
रात्री दहाच्या नंतर वाहनांवर लावण्यात येणाऱ्या स्पीकरचा आवाज कमी करण्यासाठी किंवा गावजवळ आले की बंद करण्यासाठी प्रशासनाने सूचना करणे गरजेचे आहे.
- सविता मुगळे, नागरिक, कडदोरा

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com