आठशे किलोमीटर धावली अन् रिकामी परतली...

संजय कापसे
Saturday, 23 May 2020

कळमनुरी आगाराकडून शुक्रवारी तीन बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यात हिंगोली १४ फेऱ्या, वसमत चार, वारंगा मार्गावर आठ, अशा एकूण २६ फेऱ्या मारण्यात आल्या. यातून केवळ अठराशे रुपयांचे उत्पन्न मिळाले.

कळमनुरी (जि. हिंगोली) : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन महिन्यानंतर आगाराच्या बस शुक्रवारी (ता.२२) रस्त्यावरून धावल्या. मात्र बस फेऱ्याना प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी बस फेऱ्यांचा खर्च अधिक व नाममात्र उत्पन्न हाताशी आल्यामुळे बस फेऱ्यांना प्रवाशांची प्रतीक्षा लागली आहे.

कोरोनामुळे दोन महिन्यापासून कळमनुरी आगाराची बस सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे आगाराचे जवळपास तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. कळमनुरी आगारात ४० बस असून शहरी व ग्रामीण भागात लांब पल्ल्याच्या मिळून दररोज दोनशे फेऱ्या मारल्या जातात. यामधून कळमनुरी आधाराला जवळपास दररोज चार लाख २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. 

हेही वाचामुंबईवाल्यांनी वाढविला घोर, पुन्हा आले सहा पाॅझिटिव्ह

जिल्हाअंतर्गत बस सेवा सुरू

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती आधीच बिकट असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाय अजून खोलात गेला. बससेवा बंद असल्यामुळे मागील दोन महिन्यात मिळणाऱ्या उत्पन्नावर आगाराला पाणी सोडावे लागले होते. या स्थितीत शासनाकडून देण्यात आलेल्या नियमांच्या अधिन राहून जिल्हाअंतर्गत बस सेवा सुरू करण्याला परवानगी मिळाली.

दिवसभरात केवळ १०१ प्रवाशांचा प्रवास 

 त्यानंतर कळमनुरी आगाराकडून शुक्रवारी तीन बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यात हिंगोली १४ फेऱ्या, वसमत चार, वारंगा मार्गावर आठ, अशा एकूण २६ फेऱ्या मारण्यात आल्या. मात्र प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दिवसभरात केवळ १०१ प्रवाशांनी प्रवास केला. उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक

त्यातून आगाराला एक हजार ८७० रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. एकूण ८०४ किलोमीटर धावलेल्या बससाठी जवळपास दीडशे लिटर डिझेल लागले. चालक- वाहकांचा वेतन खर्च व बस गाड्यांचा देखभाल खर्च पाहता बस फेऱ्यासाठी खर्च अधिक झाला. त्यामुळे एस. टी. महामंडळासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

१९३ कर्मचारी कार्यरत

कळमनुरी आगारात १९३ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये सत्तर चालक व ७७ वाहक, यांत्रिक विभागात २६ कर्मचारी कार्यरत आहेत. कार्यालयीन कामकाजासाठी २० अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत.

येथे क्लिक कराकोरोनाची धास्ती : हिंगोलीत सभेविनाच अर्थसंकल्पास मान्यता

स्त्यांची दुरवस्था

 तब्बल दोन महिन्यानंतर जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली. पहिल्याच दिवशी प्रवाशांची पाठ फिरविल्याचे चित्र पहावयास मिळाले. उत्पन्न कमी व खर्चच अधिक झाल्याने एसटी. महामंडळाचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, जिल्ह्यातील रस्त्यांचीही बिकट अवस्था असून खड्डेमय रस्त्यांवरूनच बस धावत आहेत. खड्ड्यांमध्ये बस आदळून बसचे नुकसानही होत आहे. त्यामुळेच काही वर्षापूर्वी सुरू असलेल्या मार्गावर सध्या बस धावत नसल्याचे दिसून येत आहे.    

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Run eight hundred kilometers and returned empty handed ...Hingoli news