दूर्दैवी घटना...! तलावात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

फोटो
फोटो

धर्माबाद (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील नायगाव येथील रहिवासी व शहरातील गुरूकूल विद्यालयात इयत्ता नववी वर्गात शिक्षण घेत असलेल्या दोन शाळकरी मुलांचा सोमवारी (ता. १७) दुपारी बाराच्या दरम्यान बाळापूर येथील तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदरील घटनेमुळे पालकवर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. 

धर्माबाद तालुक्यातील नायगाव येथील लखन सिधप्पा राचेवाड (वय १४) आणि साईचरण किशनराव आलूरोड (वय १४) हे दोघेजण येथील गुरूकूल विद्यालयात इयत्ता नववी वर्गात शिक्षण घेत होते. तसेच शाळेच्याच वसतीगृहात राहत होते. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता वसतीगृहातून शाळेत गेले. शाळेच्या मध्यान्ह सुट्टीनंतर शाळेतील शिक्षकांना न सांगता शाळेपासून जवळच असलेल्या बाळापूर येथील तलावात पोहण्यासाठी शाळेतील काही मित्रांसोबत गेले होते. त्यापैकी वरील दोघांनी अंगावरील कपडे, चप्पल काढून पाण्यात उतरले असता तलावात मोठ मोठे खड्डे असल्यामुळे दोन्ही मुले पाण्यात बुडाले असून दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडत असलेले पाहून आलेल्या मित्रांनी आरडाओरडा करत पळ काढला. 

पोलिसांनी शोध लावून दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले

सदरील घटनेची माहिती परीसरातील लोकांना कळताच लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना कळविली आहे. लगेच घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले, बाळापूर बीटचे जमादार व्ही. एस. स्वामी यांनी दाखल झाले. पाण्यात बुडालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी बीट जमादार स्वामी, नायगावचे माजी सरपंच मारोती पोतन्ना तोकलवाड, कानोजी कोंडिबा फुलवाड रा. नायगाव, शाम मारोती पांचाळ रा. रत्नाळी, सय्यद निजाम अतकुर (ता. धर्माबाद)
यांनी पाण्यात उतरून शोध मोहीम सुरू केली. 

शिक्षक व संचालकावर कार्यवाही करण्याची मागणी 

मयत लखन किशनराव आलूरोड याचा मृतदेह सापडला. बऱ्याच वेळानंतर साईचरण किशनराव आलूरोड याचाही मृतदेह पाण्यात सापडला आहे. लखन सिधप्पा राचेवाड याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. परंतु साईचरण किशनराव आलूरोड याचा मृतदेहास नातेवाईकांनी उचलू दिले नाही. घटना घडून चार घंटे झाले तरी शाळेतील एकही शिक्षक व शाळेचा संचालकवर्ग घटनास्थळी आले नसल्यामुळे वातावरण तणावपूर्ण निर्माण झाले. यावेळी शाळेतील शिक्षक व संचालकावर कार्यवाही करण्याची मागणी धरून नातेवाईक जागेवरच ठिय्या आंदोलन सुरू केले. घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी केली होती. 

सहावाजेपर्यंत दुसरा मृतदेह घटनास्थळीच

पोलिस निरीक्षक सोहन माछरे हे घटनास्थळी दाखल झाले. उपस्थित नातेवाईकांनी पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांच्याकडे एकच मागणी लावून धरली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण निर्माण झाले आहे. सायंकाळी सहावाजेपर्यंत दुसरा मृतदेह घटनास्थळीच आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून गूरूकूल शाळेतील मुले तलावात पोहण्यासाठी येत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. सदरील घटनेची माहिती शाळेतील शिक्षकांना व वसतीगृह अधिक्षकास अनेकांनी दिले होते. परंतु सदरील बाबीकडे दुर्लक्ष केल्यामुळे सदरील घटना घडली असल्याची चर्चा शहरातील जनतेत होत आहे. घटनास्थळी तहसिलदार डी. एन. शिंदे, अब्दूल सत्तार, उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी, अशोक पाटील बाळापूरकर, तलाठी सहदेव बासरे यांच्यासह अनेकांनी भेट दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com