खरेच होणार मिटमिट्यात सफारी पार्क

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

  • महापालिका अधिकारी, पीएमसीने केल्या त्रुटी दूर 
  • स्मार्ट सिटीतून आहे 145 कोटी रुपयांची तरतूद 
  • पुढील आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्‍यता 
  • प्राणिसंग्रहालयाचे होणार स्थलांतर 

औरंगाबाद- महापालिकेने मिटमिटा भागात शंभर एकरांत 145 कोटी रुपये खर्च करून सफारी पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे डीपीआर मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या डीपीआरला आठवडाभरात मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. महापालिका अधिकारी व डीपीआर तयार करणाऱ्या दिल्लीच्या एजन्सीने नुकतीच चुकांची दुरुस्ती केली. त्यामुळे सफारी पार्कचा मार्ग मोकळा होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

महापालिकेचे सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय वादात सापडले होते. प्राण्यांसाठी असलेली अपुरी जागा, चुकीच्या पद्धतीने केलेली पिंजऱ्यांची मांडणी, मास्टर प्लॅनकडे महापालिकेचे झालेले दुर्लक्ष यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय संचालनालयाने प्राणिसंग्रहालयाची मंजुरी रद्द केली होती. त्यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान, महापालिका पदाधिकाऱ्यांसह तत्कालीन लोकप्रतिनिधी, आयुक्तांनी दिल्लीत धाव घेऊन आपली बाजू मांडली. त्यानंतर सफारी पार्कचे काम तातडीने सुरू करण्याच्या अटीवर प्राणिसंग्रहालयाला एका वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली. 

हेही वाचा लग्नातून परतणारा युवक परळीजवळ ठार, दोघे गंभीर

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने काढल्या होत्या त्रुटी 
महापालिकेने दिल्ली येथील ब्रिजराज शर्मा या पीएमसीकडून सफारी पार्कचा 145 कोटींचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प आराखडा) तयार करून घेतला. तो तीन महिन्यांपूर्वीच केंद्रीय संचालनालयाकडे सादर करण्यात आला आहे. सफारी पार्कसाठी स्मार्ट सिटी योजनेतून 145 कोटी रुपयांची तरदूत करण्यात आली आहे. दरम्यान, या डीपीआरमध्ये काही त्रुटी असल्याचे समोर आले. या त्रुटी दूर करण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार महापालिका अधिकारी व पीएमसीच्या प्रतिनिधींनी 26 नोव्हेंबरला त्रुटींची दुरुस्ती केली. यासंदर्भात प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले की, त्रुटींची पूर्तता केल्यानंतर सकारात्मक चर्चा झाली असून, डीपीआरला आठवडाभरात मंजुरी मिळेल. 

हेही वाचा लग्नातून परतणारा युवक परळीजवळ ठार, दोघे गंभीर

महापालिकेत करणार सादरीकरण 
सफारी पार्कचा डीपीआर तयार झाल्यानंतर पीएमसीने सर्वसाधारण सभेच्या सभागृहात सादरीकरण केले होते. त्यावेळी पदाधिकारी व नगरसेवकांनी काही दुरुस्त्या सुचविल्या. त्यानुसार दुरुस्ती करून डीपीआर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला सादर करण्यात आला होता. आता प्राधिकरणाच्या सूचनेनुसार त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत; मात्र त्रुटी काय होत्या, सुधारणा काय केली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यासंदर्भात लवकरच महापालिकेत सादरीकरण करण्यात येणार असल्याचे श्री. नाईकवाडे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Safari Park in Mitmita