लग्नातून परतणारा युवक परळीजवळ ठार, दोघे गंभीर 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 28 November 2019

  • टोकवाडी-परळी रस्त्यावरील घटना
  • राखेच्या टँकरने दिली धडक
  • साेबतचे दाेन युवक गंभीर

 

परळी वैजनाथ (जि. बीड) -  टोकवाडी-परळी रस्त्यावर दुपारी दोनच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या राखेच्या टॅंकरने परळीकडे येणाऱ्या दुचाकीस्वारास जोराची धडक दिली. यात दुचाकीचालक ठार, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. 

तालुक्‍यातील टोकवाडी येथे रत्नेश्‍वर मंदिरात नंदागौळ येथील विवाह सोहळा गुरुवारी (ता. 28) होता. नंदागौळ येथील शिवराज सतू गित्ते, शिवाजी बाबूराव गित्ते, नितीन पंढरी गित्ते हे विवाह सोहळा आटोपून परळीमार्गे नंदागौळकडे दुुपारी दोनच्या सुमारास दुचाकीने (एमएच-24-6741) जात होते. औष्णिक विद्युत केंद्राच्या कार्यालयाजवळील उड्डाणपुलावर समोरून भरधाव येणाऱ्या राखेच्या टॅंकरने (एमएच-44-7495) जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार शिवराज गित्ते याचा मृत्यू झाला. शिवाजी गित्ते, नितीन गित्ते हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांना तत्काळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - खंजरने मारून ट्रकचालकाला लुटले

 दरम्यान, येथे औष्णिक विद्युत केंद्र असल्याने शहरातून दररोज राखेची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होते. या टॅंकरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात राखेची वाहतूक केली जाते. याकडे पोलिस प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. या वाहनावर कोणतीही कारवाई केली जात नाही; मात्र काही दिवसांपासून दुचाकीचालक, ऑटोरिक्षावर कारवाई केली जाते. 

हेही वाचा - पोलिसांवरच भार, इतर विभागांचा निवांत कारभार

शहरातील प्रमुख रस्त्यावर कोठेही वाहतूक पोलिस नसतो. फक्त ठराविक ठिकाणी आवश्‍यकता नसताना वाहतूक पोलिस उभे असतात. याबद्दल नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. शहरातूनही दिवसा या राखेच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे; पण रात्री क्षमतेपेक्षा जास्त राखेची उघडी वाहतूक होते. शहरातील अनेक रस्त्यावर ही राख पडलेली दिसून येते. दिवसभर राखेच्या धुळीचा दुचाकीचालकांना त्रास सहन करावा लागतो आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth killed in accident