Sahitya Sammelan : प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता कायमच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social Media

साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी माध्यमतज्ज्ञ जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर येऊन ठेपली आहे’ या विषयावर परिसंवाद झाला.

Sahitya Sammelan : प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता कायमच

उदगीर - प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता कायम असून साहित्य संमेलनाचा टीआरपी वाढविण्यासाठी अशा विषयावरील परिसंवाद आयोजित केला गेला, असे स्पष्ट मत व्यक्त करीत विश्वासार्हता जपण्याची जबाबदारी माध्यमांबरोबरच वृत्तपत्राशी संबंधित अन्य घटकांचीही आहे, असा सूरही निघाला.

साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी माध्यमतज्ज्ञ जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर येऊन ठेपली आहे’ या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये श्रीपाद अपराजित, जयप्रकाश दगडे, धनंजय भिसे, अरुण समुद्रे, प्रदीप नणंदकर, दत्ताहरी होनराव, नम्रता वागळे आदी सहभागी झाले होते.

प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता अजिबातच कमी झालेली नाही असा मुद्दा उपस्थित करून अपराजित म्हणाले, की पत्रकारिता समाजाला अद्ययावत ठेवत आहे. विवेकाला शाबूत ठेवणे आवश्यक आहे. प्रसारमाध्यमांतील पुढील काळ भेदक असून माध्यमकर्मींनी विवेकाद्वारे निरोगी राहावे.

विश्वासार्हता धोक्यात आहे की नाही हे महांमडळाने ठरविण्यापेक्षा वाचकांनी ठरवावे, असे सांगत दगडे म्हणाले, की दूरचित्रवाणीमुळे विश्वासार्हता पणाला लागली आहे. सत्याची उपासना करणारा आता दुःखी आहे. श्री. भिसे म्हणाले, की स्वातंत्र्यपूर्व काळात आणि आताची पत्रकारिता यामध्ये फरक आहे. पूर्वी वर्तमानपत्राचा वाचक होता, आता ग्राहक झाला आहे. सामाजिक न्यायाची भूमिका प्रसारमाध्यमे निभावत आहे.

वागळे म्हणाल्या, की माध्यमांमध्ये सामाजिक भान अजूनही कायम आहे. डिजिटल माध्यमांचा काही प्रमाणात सुळसुळाट झाला आहे, त्यामुळे सर्वच माध्यमांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. डिजिटल माध्यमांसाठी विशिष्ट धोरण असले पाहिजे. श्री. समुद्रे म्हणाले, की समाज आणि पत्रकारिता या दोन्ही बाजूंनी विश्वासार्हता जपली पाहिजे. माध्यमांचा एकांगीपणा वाढला आहे. विकासाच्या बातम्यांना चांगला प्रतिसाद चांगला मिळतो.

श्री. नणंदकर म्हणाले, की वृत्त आणि वसा दोन्ही कमी झाला आहे. आता माध्यमकर्मींनी रुबाब करणे योग्य नाही. श्री. होनराव म्हणाले, निर्भीड पत्रकारितेला समाजाने कायम पाठिंबा दिला आहे. समाजाचे सत्य दाखविणे सोपे राहिलेले नाही. प्रसंगी जीवही धोक्यात घालावा लागतो.

सर्वांचीच जबाबदारी - डोळे

श्री. डोळे म्हणाले, संपादकांच्या नावाने ओळखली जाणारी वृत्तपत्रे संपली आहेत. संपादकांचे महत्त्व कमी होते, तिथे शब्दांचेही महत्त्व कमी होते. माध्यमांची विश्वासार्हता जपण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांची आहे, तशीच ती वृत्तपत्र चालविल्या जाणाऱ्या मालकांचीही आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मग विश्वासार्हता कोणी कमी केली, हा प्रश्न पडतो.

Web Title: Sahitya Sammelan Credibility Of The Social Media Forever

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top