साईबाबांचे जन्मस्थान पाथरीच...!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

साईबाबांचा जन्म पाथरीतच झाला असल्याचा दावा परभणीतील साई साहित्याचे अभ्यासक तथा संशोधक दिलीप देशपांडे, चारठाणकर यांनी केला आहे.दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पाथरीसाठी दिलेला निधी हा तिर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून दिला जाईल असे सांगून या वादावर पडदा पाडला. परंतू साई संस्थान पाथरी व मराठवाड्यातील साईभक्त हे मान्य करण्यास तयार नाहीत.

परभणी ः साईबाबांचा जन्म पाथरीतच झाला असल्याचा दावा परभणीतील साई साहित्याचे अभ्यासक तथा संशोधक दिलीप देशपांडे, चारठाणकर यांनी केला आहे. आपल्याकडे विविध पुरातण पुस्तके व ग्रंथ असून त्या आधारे साईबाबांचे जन्मस्थान पाथरीच असल्याचे आपण सिध्द करू शकतो असे ही त्यांनी या वेळी सांगितले.

पाथरी येथील साईबाबांच्या जन्मस्थळाचा दावा साईसंस्थान शिर्डीकडून फेटाळला जात आहे. परंतू साईबाबांचे जन्मस्थळ हे पाथरीच असून त्याचे अस्तित्व आम्ही कायम टिकविणार असल्यावर परभणी जिल्ह्यातील साईभक्त ठाम आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साई जन्मस्थळाला १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानंतर या वादाला जास्तच तोंड फुटले आहे. मुख्यमंत्र्यांनी पाथरीसाठी दिलेला निधी हा तिर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून दिला जाईल असे सांगून या वादावर पडदा पाडला. परंतू साई संस्थान पाथरी व मराठवाड्यातील साईभक्त हे मान्य करण्यास तयार नाहीत.

हेही वाचा -अबब...तुर विक्रीसाठी एक हजार दोनशे शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी

 

साईजन्मासंदर्भात जुनी पुस्तके समोर आली

हा वाद सुरु असतांनाच साईबाबांच्या जन्मासंदर्भात अनेक जुनी पुस्तके समोर आली आहेत. मागील ३० ते ३५ वर्षापासून परभणी शहरातील रहिवाशी दिलीप देशपांडे, चारठाणकर यांनी साईबाबांच्या साहित्याचा अभ्यास व संशोधन सुरु केले आहे. या संदर्भात माहिती देतांना श्री.देशपांडे यांनी साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी हेच असल्याचे आपण पुराव्यानिशी आपण सिध्द करू शकतो असा त्यांनी दावा केला आहे. यात त्यांनी १९८८ च्या सरकारी गॅझेटरसोबतच शिर्डी के साईबाबा हे पं.राकेश शर्मा लिखित पुस्तक, एका इंग्रजी संकेतस्थळावर सुध्दा एका प्रगटनात साईबाबांच्या जन्मस्थळ पाथरीच असल्याचा उल्लेख आहे. साईबाबांचे जन्मस्थळ व इतर इतिहास शोधणारे वि. बा. खेर लिखित ‘फुलोरा’ या पुस्तकातही त्याची नोंद आहे. हे पुस्तक कोमल प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. परभणी-हिंगोली जिल्हा दर्शन हे पुस्तक मो. के. कुंटे व विजया कुंटे यांनी प्रकाशित केले त्यातही साईबाबांच्या जन्मस्थळाचा पाथरी असाच उल्लेख असल्याचे श्री.देशपांडे यांनी सांगितले.

साईबाबांचे व बाबासाहेब महाराजांचे संबंध

साईबाबांचे गुरु सेलू येथील बाबासाहेब महाराज हे आहेत, तसा पुराणात उल्लेख देखील आढळतो.साईबाबांच्या धर्मनिरपेक्षपणामुळे तत्कालीन लोकांनी त्यांना संपविण्याचा डाव मांडला होता. परंतू, बाबासाहेब महाराजांनी साईबाबांचे प्राण वाचवून त्यांना पश्चिमेकडे जाण्यास सांगितले. तेव्हापासून साईबाबांनी सेलू सोडून पुढे धुपखेडा (जि.बीड) येथे गेले.

साईबाबांचे वंशजाचे वास्तव्य हैदराबादेत

साईबाबांचे काही वंशज हे सध्या हैदराबादेत वास्तव्यास आहेत. परंतू ते साईबाबांच्या संदर्भात काहीही बोलण्यास तयार नाहीत. ते हमखास पाथरी व शिर्डी येथे दर्शनासाठी जातात असेही श्री.देशपांडे यांनी सांगितले.

देशपांडेच्या लेखावर शिर्डी संस्थानचा आक्षेप

संत साहित्याचे अभ्यास दिलीप देशपांडे चारठाणकर यांनी यापूर्वी एप्रिल २००१ मध्ये ‘सकाळ’ अंकात एक लेख लिहिला होता. तो प्रसिध्द ही झाला. परंतू, या लेखावर साईसंस्थान शिर्डीच्यावतीने आक्षेप घेवून साई जन्मासंदर्भात साशंकता असून आपण असे लिखान करू नये असे पत्र देशपांडे यांना पाठविले होते, असे त्यांनी सांगितले.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saibaba's birthplace is just like pathri ...!