अबब...तुर विक्रीसाठी एक हजार दोनशे शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी

किशन बारहाते
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

मालाची आवक सुरु, आता प्रतीक्षा खरेदीची

मानवत ः येथील शासकीय हमीभाव केंद्रावर किमान आधारभूत दराने तुर विक्री करण्यासाठी एक हजार २१० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. बाजारात या वर्षीच्या मालाची आवक सुरु झाली असून आता शेतकऱ्यांना खरेदी सुरु होण्याची प्रतीक्षा आहे.

दरवर्षी हंगामाच्या सुरवातीला शेतमालाची आवक वाढून शेतमालाचे दर कोसळतात. यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल कवडीमोल दराने विक्री करावी लागते. राज्य शासनाने राज्यभर किमान आधारभूत दराने शेतमाल खरेदी करण्यासाठी केंद्र सुरु केले आहेत. या केंद्रावर खरीप व रब्बी मालाची हमीभावाने खरेदी केली जाते. 

बाजारपेठेत तुरीला प्रतीक्विंटल चार हजार दोनशेचा भाव
मानवत येथे विदर्भ को - ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे शेतमालाची खरेदी केली जात आहे. यात तुरीला प्रतीक्विंटल पाच हजार ८०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तुर खरेदीसाठी एक जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. शुक्रवार (ता.२४) पर्यंत या केंद्रावर एक हजार २१० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. दुसऱ्या बाजूला बाजारपेठेत तुरीची आवक सुरु झाली असून प्रतीक्विंटल चार हजार ते चार हजार २०० या दराने खरेदी केली जात आहे. 

तत्काळ खरेदी सुरु करण्याची मागणी
येत्या काळात मालाची आवक वाढून तर अजून खाली येण्याची शक्यता आहे. दरवर्षी खरेदी विलंबाने होत असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करून कमीदराने आपला माल विक्री करावा लागतो. या वर्षी देखील खरेदी प्रक्रिया विलंबाने सुरु होण्यार आहे. यामुळे तत्काळ खरेदी सुरु करण्याची मागणी शेतकरीवर्गातून केली जात आहे.

हेही वाचा - बंदला परभणीत संमिश्र प्रतिसाद

सोयाबीनची खरेदीच नाही...
केंद्र शासनाने सोयाबीनला तीन हजार ७१० रुपये प्रती क्विंटल हमीभाव निश्चित केला आहे. परंतु खुल्या बाजारपेठेत चार हजार रुपयांपेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर माल विक्री केला नाही. येथील हमीभाव केंद्रावर १६३ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. परंतु, एकाही शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणला नाही.

हेही वाचा - वंचित’च्या बंदला नांदेडमध्ये प्रतिसाद

मुग खरेदीची रक्कम जमा...
येथील खरेदी केंद्रावर नोव्हेंबर महिन्यात १३३ शेतकऱ्यांनी ७०७ क्विंटल मुग विक्री केला होता. या शेतमालाचे ४९ लाख ८७ हजार ८७५ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर शेतमालाचे पैसे देण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online registration of one thousand two hundred farmers for sale of trump