कामगारांना उपलब्ध करून दिली औषधी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

शहरातील ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. मात्र काम करणाऱ्या कामगारांना सरोवरातील दूषित पाणी व उन्हामुळे इन्फेक्‍शन होत असून, त्वचेवर फोड, पुरळ येत आहेत.

औरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक सलीम अली सरोवरातील जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. मात्र काम करणाऱ्या कामगारांना सरोवरातील दूषित पाणी व उन्हामुळे इन्फेक्‍शन होत असून, त्वचेवर फोड, पुरळ येत आहेत. त्यामुळे या कामगारांच्या अंगाला इन्फेक्‍शन होऊ नये म्हणून औषधी देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

डॉ. सलीम अली सरोवराची मोठी दुरवस्था झाली आहे. चारही बाजूंनी अतिक्रमणांचा विळखा पडत असून, सरोवरात जलपर्णीचा वेढा पडला आहे. त्यामुळे सरोवरातील जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी जलपर्णी काढण्याचा निर्णय घेतला. रायगड येथील तज्ज्ञ शेखर भेडसावले यांच्या मार्गदर्शनाखाली १७ एप्रिलला रंगीत तालीम घेण्यात आली. महापालिकेने औषध फवारणी केली व या फवारणीमुळे जलपर्णी नष्ट होत असल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार गेल्या दोन आठवड्यापासून सरोवरात औषध फवारणी करून जलपर्णी काढली जात आहे. सात-आठ कामगार येथे काम करत आहेत. प्रचंड उन्ह व सरोवरातील दूषित पाण्यामुळे या कामगारांना इन्फेक्‍शन होत आहे. याबाबत आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी (ता. २१) सांगितले, की सरोवरातील पाण्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अंगावर पुरळ येत आहे. त्वचेचे सालटे निघत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना औषधी लावून काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे ते काम करत आहेत. सरोवरातून नष्ट झाल्यानंतर काढल्या जाणाऱ्या जलपर्णीचा खत म्हणून वापर केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal news impact Medicinal made available to workers