पगाराचा पैसा अडकला बॅंकेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

नोटाबंदीचा फटका - पतपुरवठ्याअभावी एटीएम, बॅंकांच्या तिजोऱ्यांत ठणठणाट, राष्ट्रीयीकृत बॅंकांचे 90 टक्‍के एटीएम बंद

नोटाबंदीचा फटका - पतपुरवठ्याअभावी एटीएम, बॅंकांच्या तिजोऱ्यांत ठणठणाट, राष्ट्रीयीकृत बॅंकांचे 90 टक्‍के एटीएम बंद
औरंगाबाद - गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीपासून अपुऱ्या पतपुरवठ्यामुळे अगोदरच चलन तुटवडा असल्याने बॅंका आणि खातेधारकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. फेब्रुवारीपासून कशाबशा चलनतुटवड्याच्या झळा कमी होत होत्या. मात्र, रिझर्व्ह बॅंकेकडून अपुरा पतपुरवठा आणि भारतीय स्टेट बॅंकांच्या विलीनीकरणामुळे शहरातील 90 टक्‍के एटीएम बंद असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर बॅंकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, पगारी आठवडा असल्याने अनेकांचा पैसा अपुऱ्या चलनपुरवठ्यामुळे बॅंकांकडे अडकला आहे.

शनिवारी, रविवारी सलग दोन दिवस सुटी आल्याने बॅंकांकडून एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कंपन्यांना रोकड पुरविण्यात आली नाही. सलग दोन दिवस एटीएममध्ये पैसे न टाकल्याने रविवारी दुपारपर्यंत सर्वच एटीएममध्ये खडखडाट झाला. दुसरीकडे पगारी आठवडा असल्याने शहरातील राष्ट्रीयीकृत, खासगी आणि सहकारी बॅंकांमध्ये रोख रकमेची मागणी दुपटीने वाढली होती. मात्र, या महिन्यात पाचही करन्सी चेस्टमध्ये रिझर्व्ह बॅंकेकडून एकही रुपया न आल्याने बॅंकांकडील रक्‍कमही संपली. परिणामत: सोमवारी बॅंकांनी एटीएमपेक्षा बॅंकेत आलेल्या खातेधारकांना प्राधान्य दिले. त्यामुळे बॅंकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी जमली होती.

सायंकाळी चारनंतर काही बॅंकांनी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी आऊटसोर्स कंपन्यांना पैसे दिले. मात्र, तरीसुद्धा केवळ चाळीसच्या आसपास एटीएम सुरु होऊ शकले. उर्वरित एटीएम सुरु होण्यास रिझर्व्ह बॅंकेकडून येणाऱ्या पैशाची वाट बघावी लागणार आहे. त्यामुळे एटीएमचे व्यवहार सुरळीत होण्यास एक आठवडा उजाडू शकतो, अशी माहिती बॅंकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बॅंकांचे सर्व्हरसुद्धा बंद
एक एप्रिलपासून स्टेट बॅंक ऑफ इंडियात विलीन झालेल्या असोसिएट बॅंकांचे सर्व्हर आणि स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे सर्व्हर बंद झाले आहे. त्याचाही एटीएमवर विपरीत परिणाम झाला आहे. ऑनलाइन आणि ऑफसाईट मशीनचे सर्व्हर बॅंकांच्या कार्यालयातच असल्याने अधिक त्रास झाला. यातही अनेक तांत्रिक अडचणी आल्या. बॅंकांमध्ये मार्च एंडचीही लगबग सुरू असल्याने त्याचाही परिणाम झाला. एटीएमही बहुतांश ठिकाणी बंदच होते. सर्वाधिक खडखडाट एसबीआय, महाराष्ट्र बॅंकेच्या एटीएममध्येच निदर्शनास आला. अनेक बॅंकांकडून एटीएममधील रोकड संपू नये म्हणून दक्षता घेण्यात आली नाही तर काहींकडून तशी दक्षता घेऊनही काहीच उपयोग झाला नाही. अनेक बॅंकांचे सर्व्हरही बंद होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: salary money bblock in bank