कोरोनामुळे वाळू चोरट्यांचे चांगभले

walu.jpg
walu.jpg


धर्माबाद, (जि. नांदेड) ः धर्माबाद शहरासह तालुक्यात अवैधरीत्या वाळूची वाहतूक होत आहे. दरम्यान, टिप्पर, ट्रॅक्टरमध्ये वाळू भरण्यासाठी तेलंगणातील मजूर व ड्रॉइव्हर एकमेकांच्या संपर्कात येत असल्याने धर्माबाद शहरात कोरोना रोगाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना आजाराने देशात थैमान घातले आहे. प्रशासनातील महसूल, पोलिस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या जबाबदाऱ्या असून यंत्रणा कामात असल्याचे पाहून तालुक्यातील वाळू चोरटे मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रातून व हुनगुंदा वांजरा नदीपात्रातून रात्रभर व पहाटे वाळू चोरी करून मनूर, बामणी, सिरसखोड मार्ग धर्माबाद शहरात धुमाकूळ घालत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र जीवनावश्यक वस्तू सोडून इतर व्यवसाय बंद आहेत. संचारबंदी असूनही वाळू माफियांचा धंदा मात्र जोरात चालू आहे.


सद्यःस्थितीत कोरोना आजाराला पायबंद घालण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रशासनातील तहसीलदार दत्तात्रय शिंदे व त्यांची यंत्रणा तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक उजगारे, पोलिस उपनिरीक्षक नागनाथ सनगल्ले, पोलिस उपनिरीक्षक गणेश कराड व पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचा स्टाफ लॉकडाऊन व कोरोना विरोधात लढत असून त्याचाच फायदा हे वाळू चोरटे घेत आहेत.

चोरट्यांच्या संचारामुळे नागरिक त्रस्त

वाळू चोरटे मोटारसायकलवर सुरवातीस अंदाज घेत टिप्पर व ट्रॅक्टरच्या पुढे मागे राहून सिरसखोड, महाराष्ट्र बसस्थानक, शंकरगंज या भागातून भरधाव वेगाने पळवतात. त्यामुळे राहिवाशांची झोपमोड होते. पहाटेच्या वेळी तर मॉर्निंग वॉकला फिरणाऱ्या नागरिकांच्या जवळून वाळूची वाहने भरधाव वेगात कट मारण्याचा प्रयत्न करतात. संचारबंदीत वाळू चोरट्यांच्या संचारामुळे नागरिक त्रस्त आहेत. 

तिप्पट भावाने विक्री

बिलोली तालुक्यातील हुनगुंदा, माचनूर, गंजगाव येथील वाळू वांजरा नदीपात्रातून व धर्माबाद तालुक्यातील संगम, मनूर, नेरली, बामणी, विळेगाव (थडी), मोकली, रामपूर या परिसरातील गोदावरी पात्रातून टिप्पर, ट्रॅक्टरद्वारे अवैधरीत्या वाळूची वाहतूक संगम, मनूर, बामणी, सिरसखोड मार्ग धर्माबाद शहरात महाराष्ट्र बसस्थानक, शंकरगंज, रत्नाळी, फुलेनगर यासह शहरात केली जात आहे. हुनगुंद्याच्या व गोदापात्रातील फुकटच्या वाळूला सोन्याचा भाव मिळत असल्याने बेसुमार अवैध वाळू वाहतूक होत आहे. वाळू ऐरव्ही दुप्पट भावाने विक्री केली जात असे. आतातर कोरोनामुळे तिप्पट भावाने विक्री करून नागरिकांची लूट केली जात आहे.

विळेगावात वाळूची तीन ट्रॅक्टर सोडली
तालुक्यातील संगम, मनूर येथील वाळू चोरटे धर्माबाद ठाण्याच्या काही पोलिस कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आहेत. ते वाळू चोरट्यांना वेळोवेळी माहिती देत असतात. एवढेच काय मनूर येथील वाळू चोरट्यांच्या टिप्पर व ट्रॅक्टरच्या मागे - पुढे पोलिस कर्मचारी महाराष्ट्र बसस्थानक ते शंकरगंज, रत्नाळीपर्यंत असतात, असे अनेक वेळा पहाटेच्या सुमारास दिसून आले. तसेच गेल्या आठवड्यात हुनगुंदा येथील तीन ट्रॅक्टर अवैधरीत्या वाळू वाहतूक करीत असताना डीवायएसपीच्या पथकाने विळेगाव (थडी) येथे पकडले. या वेळी विळेगाव येथील अनेक प्रतिष्ठित नागरिक जमले होते. पोलिसांनी अवैध वाळूची तीन ट्रॅक्टर पकडली खरी, परंतु कोणतीही कारवाई न करताच सोडून दिली. यामुळे विळेगावात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com