

Illegal Sand Mining in Girkachal 30 to 40 People Attack Revenue Team Damage Government Vehicle and Assault Local Talathis
sakal
निलंगा : गिरकचाळ ता. निलंगा येथे अवैध वाळू साठवणूक व वाहतुक करणाऱ्यावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावरच वाळू माफीयानी प्राणघातक हल्ला केला. सुमारे तीस ते ४० जणांच्या जमावाने शासकीय वाहनावर दगडफेक करत तलाठ्यांना पट्ट्याने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी ता. 24 रोजी झाला विशेष म्हणजे हल्ल्यानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांवरही माफियांची इतकी दहशत की, पुन्हा मारहाणीच्या भीती पोटी त्यांना पोलीस ठाण्यातून तक्रारी विना माघारी फिरावे लागले. त्यामुळे सध्या तालुक्यात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून प्रशासनाच्या नाकावर टिच्चून हा प्रकार झाल्याने महसूल प्रशासनाची झालेली 'बेअब्रु' कशी भरून निघणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात वाळू माफियांचा सुळसुळाट अन् प्रशासनाची हतबलता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.