राष्ट्रवादीचा वाटा पडला काँग्रेसच्या संजय दौंड यांच्या पदरात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 January 2020

राष्ट्रवादी काँग्रेसने आपला वाटा बीड जिल्ह्यातील काँग्रेसला देण्याचे जवळपास निश्चित केले होते. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे विधानसभेला विजयी झाल्याने त्यांच्या रिक्त जागेसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे संजय दौंड यांची उमेदवारी निश्चित असल्याची खात्री अनेकांना होती. विधानसभा निवडणुकीवेळी खुद्द शरद पवार व अजित पवार यांनी दौंड यांना शब्द दिला होता.

बीड : धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या विधान परिषदेतील आमदारकीसाठी परळी मतदारसंघात पोटनिवडणुक होत आहे. यात काँग्रेसचे संजय दौंड यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दौंड यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार आता संजय दौड यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.

उमेदवारी निश्चित असल्याची खात्री अनेकांना

राष्ट्रवादी काँग्रेसने आपला वाटा बीड जिल्ह्यातील काँग्रेसला देण्याचे जवळपास निश्चित केले होते. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे विधानसभेला विजयी झाल्याने त्यांच्या रिक्त जागेसाठी होत असलेल्या विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे संजय दौंड यांची उमेदवारी निश्चित असल्याची खात्री अनेकांना होती. विधानसभा निवडणुकीवेळी खुद्द शरद पवार व अजित पवार यांनी दौंड यांना शब्द दिला होता.

धनंजय मुंडे यांच्या रिक्त जागेसाठी निवडणुक

मागच्या विधानसभा निवडणुकीत परळीतून पराभूत झालेल्या धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेवर घेत विरोधी पक्षनतेपद दिले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीवेळी खुद्द पवार चुलते - पुतण्यांनी संजय दौंड यांना विधान परिषदेचा शब्द दिला होता. त्यानंतर माजी मंत्री पंडितराव दौंड व संजय दौंड धनंजय मुंडे यांच्या प्रचारात आघाडीवर होते. आता धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणुक होत आहे. 

अमरसिंह पंडित व जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे दावेदार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरला राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यातही पवारांनी दौंड यांच्या उमेदवारीचे संकेत आपल्या मंत्र्यांना दिले होते. राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित व जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे दावेदार मानले जात होते. मात्र, ही आमदारकी पूर्ण कालावधीची नसल्याने अमरसिंह पंडित फारसे इच्छुक नव्हते. तर, खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या विरोधात निवडणुक लढल्याने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे देखील इच्छुक होते. परंतु, आठच दिवसांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची पक्षाने त्यांना संधी दिली. त्यातच खुद्द पवारांनी दौंड यांना शब्द दिल्याने इतर कोणी यासाठी लॉबींगही केले नव्हते.

दौंड - पवार कुटूंबियांचे जुने राजकीय ऋणानुबंध

दौंड काँग्रेसचे असले तरी दौंड - पवार कुटूंबियांचे जुने राजकीय ऋणानुबंध आहेत. त्यांचे वडिल पंडितराव दौंड हे मंत्री होते. काही कारणाने त्यांना अल्पकाळच मंत्रीपदावर काम करता आले. त्यामुळे राष्ट्रवादीचा वाटा शरद पवारांमुळे काँग्रेसच्या दौंड यांना मिळणार असल्याचे निश्चित होते. त्यानुसार आता ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Daund is candidate NCP and congress marathi political news