संत साहित्य हे दुभंगलेली मने जोडण्याचे महान कार्य करते - प्रा. सुपारे

राजेश दारव्हेकर
Wednesday, 20 January 2021

मराठी भाषा पंधरवाडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात मुख्य वक्ते म्हणून प्रा. उत्तम सुपारे यांनी आपले विचार मांडताना असे सांगितले की  स्त्री संत महिलांनी खऱ्या अर्थाने अध्यात्मिक लोकशाहीची पायाभरणी केली आहे.

हिंगोली : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व मराठवाडा साहित्य परिषद हिंगोलीच्या वतीने   मराठी भाषा पंधरवाडा निमित्त व ज्ञानपीठ विजेते वि.स.खांडेकर यांच्या जयंती  निमित्ताने परिसंवादाचे मंगळवारी ता. १९  अंतुले नगर भागातील  अर्धापुरकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. 

महाराष्ट्र शासनाने १४  जानेवारी ते २८ जानेवारी हा पंधरवाडा साजरा करण्याचे सांगितले होते. हिंगोली येथील मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषा पंधरवडा दिनानिमित्त परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाचा विषय मानसिक स्वास्थ्यासाठी संत साहित्याची अपरिहार्यता  हा होता.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसापचे अध्यक्ष अशोक अर्धापुरकर  तर  प्रमुख वक्ते म्हणून प्रा. उत्तम सुपारे, कवि रतन आडे, लेखक नरेंद्र नाईक,  दत्ता पुरी , कवि महारुद्र घेणेकर यांची उपस्थिती होती. 

मराठी भाषा पंधरवाडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात मुख्य वक्ते म्हणून प्रा. उत्तम सुपारे यांनी आपले विचार मांडताना असे सांगितले की  स्त्री संत महिलांनी खऱ्या अर्थाने अध्यात्मिक लोकशाहीची पायाभरणी केली आहे. त्याचप्रमाणे विविध संतांच्या विचारांची उदाहरणे दिली. संत साहित्यामुळे समाजातील दुभंगलेली मने जोडण्याचे महान कार्य संतांनी केले आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. 

हेही वाचासंविधानामुळेच संधी : कोयत्याऐवजी आता ऊसतोड महिलेच्या हाती खासदारांच्या गावचा कारभार ? चिखलीच्या ग्रामस्थांचा मतरुपी निकाल

त्यानंतर दुसरे वक्ते दत्ता पुरी यांनी अनेक संतांचे संदर्भ देत पसायदानातील रचना सौंदर्य  व समकालीन संतांच्या योगदानावर सविस्तर माहिती दिली. त्याच प्रमाणे महारुद्र घेणेकर यांनी  सध्याच्या परिस्थितीत बोकाळलेल्या जातीय वादावर तीव्र निषेध व्यक्त करत भागवत धर्माच्या माध्यमातून व भक्तिमार्गातून समाजात परिवर्तन होत असल्याचेही सांगितले. तर परिसंवादात कवी रतन आडे यांनी आपले विचार मांडताना असे सांगितले की कोरोनाच्या परिस्थितीतही संत महंतांचे विचार, त्यांचे तत्त्व समाजासमोर आदर्श आहेत. सामाजिक व नैसर्गिक पर्यावरणाचे संतुलन राखण्यास संतांचे विचार खुप महत्वाचे आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले. या परिसंवादाचे अध्यक्ष अशोक अर्धापुरकर यांनी साहित्य आणि संस्कृती मंडळाची भूमिका स्पष्ट केली. जागतिक उदात्तीकरणात कोव्हीड-१९ या प्रादुर्भावामुळे आर्थिक व्यवस्था उद्ध्वस्त झाली असतानाही संतसाहित्य हे मार्गदर्शक ठरत आहे असे सांगितले.यावेळी नरेंद्र नाईक, प्रा.जयप्रकाश पाटील गोरेगावकर, डॉ.विकास साळवे, पांडुरंग गिरी, दिलीप धामणे, विजय गुंडेकर, रतन आडे यांच्या सह रसिकांची उपस्थिती होती. परिसंवादाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कवि कलानंद जाधव यांनी केले. तर प्राचार्य  नामदेव वाबळे यांनी उपस्थितींचे आभार मानले.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sant Sahitya does a great job of uniting broken minds Prof. Supare hingoli news