
Jalana Crime : लाच घेताना रोहिना बुद्रूक येथील सरपंचाला घेतले ताब्यात
जालना - शाळेच्या वर्ग खोलीचे बांधकाम केल्याच्या बिलाचा धनादेश देण्यासाठी परतूर तालुक्यातील रोहिना बुद्रूक येथील सरपंच जसाराम आसाराम कुंभारे याला ३२ हजारांची लाच घेताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता. सात) ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार यांनी परतूर तालुक्यातील रोहिना गावातील शाळेच्या खोलीचे बांधकाम केले होते. या बांधकामाचे चार लाख रुपयांच्या बिलाचा धनादेश येणे बाकी होते. चार लाख बिलाच्या चेकवर ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक होत्या. त्यांपैकी ग्रामसेवक यांनी यापूर्वी स्वाक्षरी केलेल्या होती. परंतु, यातील सरपंच कुंभारे याने स्वत:ची स्वाक्षरी करून धनादेश देण्यासाठी आठ टक्के प्रमाणे ३२ हजारांच्या लाचेची मागणी केली. या प्रकरणी तक्रारदार यांनी जालना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
या तक्रारीची पडताळणी करून बुधवारी सापळा रचून पंचासमक्ष ३२ हजारांची लाच स्वीकारताना सरपंच जसाराम कुंभारे याला ताब्यात घेतले. या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक एस.एस.शेख, पोलिस अंमलदार गणेश चेके, जावेद शेख, कृष्णा देठे, चालक प्रवीण खंदारे यांनी केली.