शेतकऱ्यांच्या कृषी निविष्ठावरील खर्चात ‘या’ यंत्रांमुळे बचत...

mkv
mkv

परभणी ः येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ञ शास्त्रज्ञांनी कृषी विभागाच्या सहकार्याने बैलचलित सौर उर्जेवरील फवारणी यंत्र तसेच ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्र विकसित केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी निविष्ठावरील खर्चात बऱ्याच मोठ्या प्रमाणात बचत झाली असून याची मागणी आता वाढत आहे.
 
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्यावतीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवून निरनिराळ्या संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषी समस्या सोडविण्याचे काम केले जाते. यंदा कृषी विद्यापीठातील तज्ञ शास्त्रज्ञांनी खास मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी दोन प्रकारचे फवारणी यंत्र विकसित केले आहे. यात बैलचलित सौर उर्जेवरील फवारणी यंत्र तर दुसरे ट्रॅक्टरचलित फवारणी यंत्राचा यात समावेश आहे. 

जांब शिवारामध्ये दोन्ही फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषी विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. आठ) जांब (ता.परभणी) शिवारामध्ये या दोन्ही फवारणी यंत्राचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. प्रात्याक्षिक कार्यक्रमास कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांच्‍यासह विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, प्राचार्य डॉ. उदय खोडके, पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्‍पाच्‍या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोंळूकी, उपविभागीय कृषि अधिकारी सागर खटकाळे, जांब गटाचे जिल्‍हा परिषद सदस्‍य बाळासाहेब रेंगे पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

४५ निवडक शेतकऱ्यांच्‍या १२५ एकरवर सोयाबीन 
प्रात्‍यक्षिक पाहण्‍याकरिता पारवा, सोन्ना व जांब या शिवारातील शेतकरी उपस्थित होते. सदरील विद्यापीठ विकसित ट्रॅक्‍टरचलित फवारणी यंत्र व बैलचलीत सौरऊर्जेवरील फवारणी यंत्राबाबत शेतकऱ्यांमध्‍ये मोठी उत्‍सुकता असल्‍याचे लक्षात आले. परभणी जिल्‍हयातील विविध गावांतील ४५ निवडक शेतकऱ्यांच्‍या १२५ एकर क्षेत्रावर कृषि विभागाच्‍या सहकार्याने विद्यापीठ विकसित 'बीबीए' पेरणी यं‍त्राद्वारे सोयाबीन लागवड करण्‍यात आली. या क्षेत्रावरील सोयाबीन पिकांची वाढ इतर पिकांपेक्षा जोमाने होत असल्‍याचे लाभार्थी शेतकरी महेश शेळके, राम गमे, रामकृष्ण रेंगे यांनी सांगितले. बीबीएफ यंत्राच्‍या वापरामुळे मोठया प्रमाणात बियाणे, खत, तणनाशक, किटकनाशक आदी निविष्‍ठांवरील खर्चात बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले. 


लागवडीवरील खर्च कमी करू शकतो
मराठवाड्यातील शेती प्रामुख्‍याने कोरडवाहु असून सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र वाढत आहे. कोरडवाहु शेतीत पिकांचे उत्‍पादन पडणाऱ्या पावसाच्‍या पाण्‍यावरच पुर्णपणे अवलंबुन आहे. हिच गरज ओळखुन बीबीएफ यंत्र विकसित केले आहे. तसेच सौर ऊर्जेचा वापर शेती क्षेत्रात करून शेतकरी बांधव लागवडीवरील खर्च आपण कमी करू शकतो. याकरिता विद्यापीठाने सौर ऊर्जेवर चालणार फवारणी यंत्र विकसित केले. 
- डॉ. अशोक ढवण, कुलगुरु, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी 


पेरणी, रासणी, कोळपणी ट्रॅक्‍टरने शक्‍य 
विद्यापीठ विकसित बहुउद्देशीय ‘बीबीएफ’ यंत्रामुळे पेरणी, रासणी, कोळपणी, तणनाशक व किटकनाशक फवारणी आदी कामे ट्रॅक्‍टरने शक्‍य आहे. ट्रॅक्‍टरला कमी रूंदीचे टायरचा वापर केल्‍यास उभ्‍या पिकांमध्‍ये कोळपणी व फवारणी शक्‍य होते. हेच सिध्‍द करण्‍याकरिता विद्यापीठ शेतकऱ्यांच्‍या शेतावर प्रात्‍यक्षिके करून दाखवित आहे. - डॉ. स्मिता सोंळूकी, संशोधन अभियंता, पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्प. 

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com