परभणीच्या शाळा, महाविद्यालयात यंत्रणा लागली तयारीला 

सकाळ वृतसेवा 
Monday, 23 November 2020

परभणी जिल्हा प्रशासनाच्या नव्या आदेशानुसार शाळांनी दुबार पुर्वतयारी सुरु केली. यामध्ये शाळा परिसर, वर्ग खोल्यांचे निर्जतुकीकरण केले जात आहे. 

परभणी ः कोरोनाची भिषणता व शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल पाहूनच शहरासह जिल्ह्यातील शाळा सुरु होण्याची शक्यता आहे. सद्या तरी (ता.दोन) डिसेंबर ही मनपा क्षेत्र वगळता दहावी व बारावीचे वर्ग सुरु करण्याची तारीख जाहीर झाली असून त्यादृष्टाने शाळा, कनिष्ठ महाविद्यालये दुबार आपआपल्या तयारीला लागले आहे. 

राज्य शासनाने ता.२३ नोव्हेंबरपासून शाळा उघडण्याचे पत्रक काढल्यानंतर शाळांनी पुर्वतयारी सुरु केली होती. परंतू, कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे त्यावर पालक वर्गातून, शिक्षक तज्ञांसह काही लोकप्रतिनिधींकडून साधक-बाधक प्रतिक्रिया उमटत असल्यामुळे शासनाने शाळांबाबतचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला होता. त्यामुळे रविवारी (ता.२२) जिल्हा प्रशासनाने ता.दोन डिसेंबरपासून सुरुवातीला दहावी व बारावीचे वर्ग व तद्‌नंतर नववी व अकरावीचे वर्ग महापालिका क्षेत्र वगळता सुरु करण्यात येणार असल्याचे आदेश निर्गमित केले होते. 

हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार निष्क्रिय ; देवेंद्र फडणवीस

शाळांनी सुरु केली दुबार पूर्वतयारी 
जिल्हा प्रशासनाने नव्या आदेशानुसार शाळांनी दुबार पुर्वतयारी सुरु केली. शाळा परिसर, वर्ग खोल्यांचे निर्जतुकीकरण केले जात आहे. सुरुवातीला दहावीचे व बारावीचे वर्ग सुरु होणार असल्याने व वर्गातील विद्यार्थी संख्येला मर्यादा असल्यामुळे २०-२५ विद्यार्थ्यांचे एक वर्ग अशी रचना केल्या जात आहे. प्रत्येक बाकावर विद्यार्थ्यांचे हजेरी क्रमांक, खोली क्रमांक टाकले जात असून दर्शनी भागात फलकावर अगदी परीक्षांप्रमाणे आसन व्यवस्था कोणत्या वर्गात कोणाची आहे, याचे लेखन केले जात आहे. वर्गनिहाय तासिकांचे वेळापत्रक, गर्दी होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची, सोडण्याची पध्दत यावर देखील चर्चा केली जात आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारे स्वच्छता पाळा, मास्कचा वापर करा, शारीरिक अंतर राखा असे संदेश देखील लिहले जात आहेत. अनेक शाळांनी थर्मल गण, ऑक्सीमिटर, सॅनिटायझर यंत्रे खरेदी केलेली असून ती कार्यान्वित देखील केली आहेत. 

हेही वाचा - परभणी : जनतेला वेठीस धरु नका, वाढीव वीज बिले मागे घ्या - प्रविण दरेकर

नियम पाळण्यासाठी आग्रही राहिले पाहिजे
सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांनी नियम पाळले पाहिजेत तर पालक व शिक्षकांनी त्यासाठी आग्रही राहिले पाहिजे. सॅनिटायझेशन, मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंग हे अतिशय महत्वाचे आहे. सॅनिटायझरचा वापर देखील मर्यादित असावा. त्यामुळे त्वचारोग होऊ शकतात, डोळ्याला देखील त्रास होतो. शाळेत विद्यार्थी येणार, त्यांना मित्र भेटणार. त्यामुळे शारिरीक अंतर पाळणे थोड अवघड आहे. परंतू, नियमांचे पालन करणे त्यामुळे महत्वाचे आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसह शाळेत येणारे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी किंवा अन्य व्यक्ती. या सर्वांची रोज आऑक्सीमिटर, थर्मल गणच्या माध्यमातून स्क्रीनींग करणे देखील तितकेच महत्वाचे आहे. विद्यार्थी नियम पाळतील याची देखील कटाक्षाने काळजी घ्यावी. पालकांचे देखील सहकार्य अपेक्षित आहे. घरी एखादी व्यक्तीला कोरोना सदृश लक्षणे असतील किंवा घरातील व्यक्तीला कोरोना होऊन गेलेला असेल तर त्याची माहिती शाळेला देणे गरजेचे आहे. 
- डॉ. रामेश्वर नाईक, लाईफलाईन हॉस्पीटल, परभणी. 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools and colleges in Parbhani are getting ready, Parbhani News