लातुरातील शाळा अन् महाविद्यालयांचा पुनश्च हरिओम लांबला, कोरोनाचा परिणाम

सुशांत सांगवे
मंगळवार, 30 जून 2020

लातूर शहरातील आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या, पालकांनी आणि शिक्षणसंस्था चालकांनी व्यक्त केलेली चिंता लक्षात घेऊन शहर आणि जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये जुलै महिन्याऐवजी ऑगस्ट महिन्यापासून सुरू करावेत, असा निर्णय जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मंगळवारी (ता.३०) घेतला. या निर्णयामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.

लातूर : राज्य सरकारच्या निर्णयानूसार शाळा, महाविद्यालयांचा पूनश्च: हरि ओम आजपासून बुधवारी (ता.एक) सुरू करण्याचे नियोजन आखण्यात आले होते. मात्र, शहरातील आणि जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या, पालकांनी आणि शिक्षणसंस्था चालकांनी व्यक्त केलेली चिंता लक्षात घेऊन शहर आणि जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये जुलै महिन्याऐवजी ऑगस्ट महिन्यापासून सुरू करावेत, असा निर्णय जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मंगळवारी (ता.३०) घेतला. या निर्णयामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाचा फैलाव टाळता यावा म्हणून सरकारने तीन-साडेतीन महिन्यांपूर्वी राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पण, जुलैपासून शाळांमधील नववी, दहावीचे आणि महाविद्यालयातील अकरावी, बारावीचे वर्ग सुरू करण्यास राज्य सरकारने नुकतीच परवानगी दिली होती. पण, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पालकांबरोबरच शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. ही चिंता जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मांडण्यात आली.

CORONA BREAKING : लातूरात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू, एकूण कोरोना बळींची...

त्यानंतर त्यांनी जुलै महिन्याऐवजी ऑगस्ट महिन्यापासून शाळा, महाविद्यालयातील संबंधीत इयत्तांचे वर्ग सुरू करावेत, असे सांगितले. या बैठकीला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) औदुंबर उकीरडे, उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, उपशिक्षणाधिकारी विशाल दशवंत, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, बजरंग चोले यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य उपस्थित होते. उकीरडे म्हणाले, या बैठकीत शाळा, महाविद्यालय ३१ जुलैपर्यंत सुरू करायचे नाही. केवळ ऑनलाईन शिक्षणावर शाळा-महाविद्यालयांनी भर द्यावा. त्यासाठी शिक्षकांनी शाळा-महाविद्यालयात यावे. शिक्षकांची उपस्थिती यापुढे अनिवार्य असेल, असे निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयातील बारावीचे वर्ग एक तारखेपासून सुरू करायचे की नाही, याबाबत शाहू महाविद्यालयातर्फे ऑनलाईन सर्वे घेण्यात आला. यात ६४ टक्के पालकांनी भीतीपोटी ‘आताच महाविद्यालय सुरू करू नका’, असे आम्हाला सांगितले. त्यामुळे आम्ही सध्या ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. प्रत्यक्ष वर्ग आताच सुरू होणार नाहीत.
- महादेव गव्हाणे, प्राचार्य, शाहू महाविद्यालय
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools,Collages Not Open, Latur News