सभापतिपदांच्या निवडी बिनविरोध

 निवडी नंतर सभापतिंचा सत्कार करण्यात आला.
निवडी नंतर सभापतिंचा सत्कार करण्यात आला.


परभणी : जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतिपदांच्या निवडी बिनविरोध झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेसलाही सत्तेत सामावून घेतले आहे. सोमवारी (ता. २०) झालेल्या विशेष सभेत निवडी करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषदेत सर्वपक्षीय महाविकास आघाडी झाल्याने अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे सभापतिपदांच्या निवडीदेखील बिनविरोध होणार हे निश्चित होते. त्यानुसार सोमवारी प्रमुख नेत्यांच्या निवासस्थानी बैठका पार पडल्या. सकाळी शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या निवासस्थानी शिवसेनेच्या सदस्यांची बैठक होऊन अंजलीताई आनेराव यांचे नाव निश्चित झाले. त्याच वेळी काँग्रेसच्या सदस्यांची बैठक आमदार सुरेश वरपुडकर यांच्या निवासस्थानी होऊन शोभाताई घाटगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी एक या दरम्यान, अर्ज दाखल करण्याची वेळ होती. त्या वेळेत महिला व बालकल्याण पदासाठी श्रीमती घाटगे यांचा एकमेव अर्ज आला. तर समाज कल्याण पदासाठी राष्ट्रवादीचे रामराव उबाळे व संध्याताई मुरकुटे यांचे अर्ज आले. तसेच उर्वरित दोन समित्यांसाठी श्रीमती आनेराव, मीराताई टेंगसे व श्रीमती मुरकुटे यांचे अर्ज आले. त्यापैकी श्रीमती मुरकुटे यांनी दोन्ही अर्ज परत घेतले. त्यामुळे महिला व बालकल्याण सभापती म्हणून श्रीमती घाटगे, समाज कल्याण सभापतिपदी श्री. उबाळे व उर्वरित दोन सभापतिपदांसाठी श्रीमती आनेराव, श्रीमती टेंगसे यांची बिनविरोध निवड झाली.
या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी काम पाहिले. त्यांना उपमुख्यकार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी सहकार्य केले. आता लवकरच शिक्षण, आरोग्य, अर्थ, कृषी आणि बांधकाम या खात्यांचे वाटप निवड झालेले सभापती व उपाध्यक्ष यांच्यात होणार आहे. निवड झालेल्या सभापतींचा आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार सुरेश वरपुडकर, माजी आमदार विजय भाबंळे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.


...अन् मतदान प्रक्रिया टळली
सभापतिपदांसाठी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीसह काँग्रेसमध्ये चढाओढ सुरू होती. मात्र, प्रमुख नेत्यांनी या निवडी बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यात सभापतिपदासाठी इच्छुक असलेल्या संध्या मुरकुटे यांनी दोन अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अस्वस्था पसरली. अखेर नेत्यांनी समजूत काढल्याने मुरकुटे यांनी अर्ज मागे घेतले.

गंगाखेड मतदारसंघाला हुलकावणी
सभापतिपदांच्या निवडीत गंगाखेड मतदारसंघाला कुठेच स्थान मिळाले नसल्याने अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गंगाखेड, पालम, पूर्णा या तीन तालुक्यांना सत्तेत स्थान मिळाले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com