उस्मानाबाद पंचायत समितीच्या उपसभापतीपदासाठी हालचालींना वेग

तानाजी जाधवर
Wednesday, 2 September 2020

उस्मानाबाद पंचायत समितीच्या उपसभापती यांना बदलुन नव्या कार्यकर्त्याला संधी देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाची पंचायत समितीवर सत्ता असुन दुसऱ्या टर्मच्या निवडी वेळीच सहा-सहा महिन्यांची वाटणी करण्यात येणार असे ठरलेले होते. नऊ महिने होत आले तरीही त्यात बदल झाला नसल्याने साहजिकच इच्छुकांमध्ये अस्वस्थता दिसुन येत असल्याचे बोलले जात आहे.

उस्मानाबाद : उस्मानाबाद पंचायत समितीच्या उपसभापती यांना बदलुन नव्या कार्यकर्त्याला संधी देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाची पंचायत समितीवर सत्ता असुन दुसऱ्या टर्मच्या निवडी वेळीच सहा-सहा महिन्यांची वाटणी करण्यात येणार असे ठरलेले होते. नऊ महिने होत आले तरीही त्यात बदल झाला नसल्याने साहजिकच इच्छुकांमध्ये अस्वस्थता दिसुन येत असल्याचे बोलले जात आहे. शेवटी यासंदर्भात पक्षांतर्गत खलबत सुरु झाली असुन लवकरच विद्यमान उपसभापती राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु आहे.

डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार, हजारो भाविकांची उपस्थिती

उस्मानाबाद पंचायत समितीवर पहिल्यांदा राष्ट्रवादीची निर्विवाद सत्ता होती. आमदार राणाजगजितसिंह पाटील भाजपवासी झाल्याने पंचायत समितीवरही भाजपचा एकतर्फी अंमल निर्माण झाला होता. सभापतीपद दुसऱ्या अडीच वर्षांसाठी अनुसुचित जातीच्या महिलेसाठी राखीव होते.त्यातही त्यांच्याकडे एकच महिला असल्याने त्यांमध्ये बदल होणे शक्य नाही. उपसभापती पदामध्ये मात्र वाटणी करण्याचा विचार नेतृत्वाने सदस्याना बोलुन दाखविला होता.

सर्वधर्म समभावाची शिकवण सदैव प्रेरणा देत राहिल, पंकजा मुंडे यांची शिवाचार्य...

सध्या उपसभापती म्हणुन संजय लोखंडे याना संधी देण्यात आली होती. त्यांच्यानंतर आता सांजा गणाचे सदस्य आशिष नायकल यांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे सदस्यामधील नाराजी दुर होऊन त्यांना नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध होईल असा विचार पक्षीय पातळीवर घेतल्याचे सुत्रानी सांगितले आहे. पंचायत समितीच्या निवडीवेळी एकतर्फी निवड झाल्याने आता नव्याने तिथे निवड करताना दगाफटका होण्याची कोणतीच शक्यता नाही.

सध्याच्या स्थितीमध्ये राजकीय अस्थिरता असल्याने सगळ्यांकडुनच कार्यकर्त्यांना सांभाळण्याची चढाओढ लागल्याचे दिसुन येत आहे. ही निवड देखील त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे. येत्या काळात राजकीय समीकरण कशा पध्दतीने असणार याचा सध्या तरी कोणीही अंदाज बांधु शकत नाही. पण आपल्याकडे असल्याला संस्थावरील पकड मजबुत ठेवण्यासाठी नेते प्रयत्न करताना दिसत आहेत. मार्च २०२२ मध्ये पंचायत समितीची मुदत संपणार आहे. उर्वरित काळात अजुन तीन सदस्याना उपसभापती पदाची संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

(संपादन - गणेश पिटेकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Selection For New Vice Chairman Of Osmanabad Panchayat Samiti