Gram Panchayat Election : सेलू तालुक्यात 12 ग्रामपंचायती बिनविरोध ; 284 इच्छुक उमेदवांचे नामनिर्देशनपत्र माघार

विलास शिंदे
Tuesday, 5 January 2021

यावेळी १२ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्यामुळे त्या गावची निवडणूक प्रक्रिया होणार नाही.

सेलू (परभणी) : तालुक्यातील एकूण ६७ ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले. यावेळी १२ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्यामुळे त्या गावची निवडणूक प्रक्रिया होणार नाही. तर १२ ग्रामपंचायतमधील विविध प्रभागातील २१ ग्रामपंचायत सदस्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज नसल्यामुळे त्या जागेसाठी निवडणूक होणार नसल्याने ते सदस्य बिनविरोध आले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

तालुक्यातील प्रिंप्रुळा, गोहेगाव, लाडनांदरा, कन्हेरवाडी, तळतूंबा, निरवाडी (खू ), करजखेडा, खूपसा, केमापूर, वाई/बोथ, खैरी, निपाणी टाकळी या 12 गावातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सदस्य संख्येनुसारच उमेदवारी अर्ज आल्यामुळे सदरिल 12 ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आमदार मेघना बोर्डीकर यांनी जाहीर केलेल्या घोषणेनुसार सदरिल ग्रामपंचायतींना आमदार फंडातील २१ लाख रूपये विकास निधीसाठी त्या ग्रामपंचायती पात्र ठरणार आहेत. त्याशिवाय ग्रामपंचायत निवडणूक टाळण्यात ग्रामस्थ यशस्वी झाल्यामुळे 12 गावात शांतता आबाधीत राहणार आहे.

मराठवाड्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

दरम्यान तालुक्यातील प्रिंपरी (बू.) येथील प्रभाग क्र.०१ व ०२ प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली आहे. तसेच गिरगाव (बू.) प्रभाग क्र. ०२ मधील ०१ जागा, सेलवाडी प्रभाग क्र. ०३ मधील एक जागा, राजूरा प्रभाग क्र.०३ मधील एक जागा, मापा प्रभाग क्र.०२ मधील एक व प्रभाग क्र.०३ मधील दोन जागा, चिकलठाणा (खू.) प्रभाग क्र.०३ मधील एक जागा, जवळा जिवाजी प्रभाग क्र.०२ मधील एक जागा, निरवाडी (बू.) प्रभाग क्र.०२ मधील एक जागा व प्रभाग क्र.०३  मधील एक जागा, हातनूर प्रभाग क्र.०२ व प्रभाग क्र.०३ प्रत्येकी एक जागा, गोमेवाकडी, प्रभाग क्र.०१ मधील ०३ तर प्रभाग क्र.०३ मधील एक, पिंपळगाव गोसावी प्रभाग क्र. ०१ मधील एक, वालूर प्रभाग क्र.०६ मधील दोन अशा एकूण 12 ग्रामपंचायतमधील २१ जागेवरील उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी अर्ज नसल्यामुळे 12 ग्रामपंचायतसह २१ ग्रामपंचायत सदस्यांना बिनविरोध निवडून येण्यास यश मिळाल्याचे चित्र नामनिर्देशनपत्र माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले आहे. 

२८४ उमेदवारांची माघार

तालुक्यातील ६७ ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र नामनिर्देशनपत्र माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले असून एकूण २८४ उमेदवारी अर्ज माघार घेण्यात आले आहेत. तसेच उर्वरित ५५  ग्रामपंचायतमधील एक हजार २९४ उमेदवारी अर्जा पैकी एक हजार दहा उमेदवार प्रत्येक्ष निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचे राजकीय भवितव्य (ता.१५) जानेवारी -२०२१ रोजी मतपेटीत बंद होणार आहे. 

वालूर ग्रामपंचायतकडे तालुक्याचे लक्ष

तालुक्याचे आकर्षण ठरलेल्या वालूर ग्रामपंचायत सर्वात मोठी असून १७ सदस्य संख्या आहे. भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय साडेगावकर व जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र लहाने यांची राजकीय भवितव्य निश्चित करणारी आहे. त्यामुळे वालूर ग्रामपंचायतीकडे तालुक्यातील नागरीकांचे लक्ष लागले आहे. 

कपबशीला पसंती

ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण १९० चिन्ह उपलब्ध असतांना देखील निवडणुकीतील उमेदवारांनी निवडणूक प्रशासनाकडे निवडणूक चिन्ह म्हणून कपबशी हेच चिन्ह मिळावे, यासाठी आग्रह धरला होता. उमेदवारांच्या पसंती क्रमांकानुसार ज्यांना कपबशी चिन्ह मिळाले त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद यावेळी द्विगुणीत झाल्याचे दिसत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Selu taluka 12 gram panchayat elections have been held without any objection