बीड जिल्ह्यात आणखी सात कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या नऊ 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 May 2020

१५ तारखेपर्यंत जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा शून्य होता. मात्र, मुंबईहून विनापरवाना आलेल्या दोघांना कोरोनाची लागण असल्याचे शनिवारी समोर आले. त्यात आता बीड सेफ म्हणून पाहुण्यांकडे आलेल्या आणखी सातजणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे रविवारी समोर आले.

बीड - कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा राज्याला आदर्श ठरावा असा पॅटर्न राबवून आतापर्यंत कोरोनाला जिल्ह्याच्या वेशीवरच ठेवणाऱ्या बीड जिल्ह्यात कोरोनाने प्रवेश केला. नगर जिल्ह्यातील रहिवासी व आष्टी तालुक्यात पाहुण्यांकडे मुंबईहून आलेल्या सात जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे रविवारी (ता. १७) स्पष्ट झाले. आता रुग्णांची संख्या नऊ झाली आहे. 

लॉकडाउनच्या तिन्ही टप्प्यांपर्यंत जिल्हा सेफ होता. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रशासनाकडून उत्तम अंमलबजावणी व नागरिकांचा प्रतिसाद यामुळे १५ तारखेपर्यंत जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा शून्य होता. मात्र, मुंबईहून विनापरवाना आलेल्या दोघांना कोरोनाची लागण असल्याचे शनिवारी समोर आले. त्यात आता बीड सेफ म्हणून पाहुण्यांकडे आलेल्या आणखी सातजणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे रविवारी समोर आले. नगर जिल्ह्यातील पिंपळगाव हुडा येथील मूळ रहिवासी असलेले व मुंबईत वास्तव्यास असलेले सात लोक सांगवी पाटण (ता. आष्टी) येथे पाहुण्यांकडे आले हेाते. ता. १३ रोजी निघून ता. १४ ला पोचले होते. 

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

नऊ रुग्णांत तीन बालके 
यापूर्वी आढळलेल्या दोघांत एक तरुण तर एक १२ वर्षांची मुलगी होती. रविवारी आढळलेल्या सात कोरोनाग्रस्तांमध्येही एक १० वर्षांचे व एक सहा वर्षांचे बालक आहे. तर, इतर पाचमध्ये एकाचे वय ६६, एकाचे ६५, एकाचे ४३, एकाचे ३८ व एकाचे ३६ आहे. या सातजणांत पाच पुरुष व दोन महिलांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven more positive in Beed district