सत्तेत आल्यास सरसकट कर्जमाफी करू : शरद पवार

भास्कर बलखंडे 
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा संकटात सापडला आहे. सरकारने उद्योगपतींसाठी बँकेत 88 हजार कोटींचा भरणा केला आहे. परंतु शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफ़ी देण्यास टाळाटाळ केली जात आहे...

जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात सुमारे सोळा हजार शेतकऱ्यांनी कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे आत्महत्या केल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहे. आघाडीचे सरकार आल्यास सर्वांना सरसकट कर्जमाफी देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. जालना येथे शुक्रवारी (ता. 20) आयोजित कार्यकर्ता मेळ्याव्यात ते बोलत होते.

यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, आमदार राजेश टोपे, माजी खासदार पुंडलिक हरी दानवे, माजी आमदार अरविंद चव्हाण, चंद्रकांत दानवे, विजय अण्णा बोराडे, डॉ. निसार देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा संकटात सापडला आहे. सरकारने उद्योगपतींसाठी बँकेत 88 हजार कोटींचा भरणा केला आहे. परंतु शेतकऱ्यांना मात्र कर्जमाफ़ी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहे. देशातील अनेक उद्योग बंद पडल्याने बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. महाभरतीचे अमिष दाखवून युवकांची फसवणूक केली जात आहे. तूर्तास युवक शांत आहे यांच्या भावनेचा उद्रेक झाल्यास हे सरकारचे अस्तित्व राहणार नाही. भाजपमध्ये जाणाऱ्या गयारामावर टिका करताना ते म्हणाले की, पंधरा वर्षे मंत्री असताना तुम्ही कोणाचा विकास केला? पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पुराने थैमान घातले असताना मुख्यमंत्री मात्र महाजनादेश यात्रेत मग्न आहे. सरकार असंवेदनशील असल्याचे पवार म्हणाले.

महाराष्ट्रातील गडकिल्ले शौर्याच प्रतिक आहे. या किल्ल्यांवरुन छम छमचा इतिहास सांगणार आहात का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी धनंजय मुंढे यांनी भाजप - शिवसेनेवर सडकून टीका केली. शरद पवार यांनी आजपर्यंत सर्वसामान्याना न्याय देण्याचे काम केले. महिलांना आरक्षण दिले, शेतकऱ्यांचे 72 हजार कोटींचे कर्ज माफी दिली. तरीही गुजरात मधील काही लोक येऊन म्हणतात महाराष्ट्रासाठी काय काम केल. ही सर्वांसाठी खेदाची बाब आहे. जो पर्यंत युवक त्यांच्या सोबत आहे तो पर्यंत पुरोगामी विचार कोणीही संपवु शकणार नाही. आता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहण्याचे आवाहन मुंडे यांनी केले. कार्यकर्ता मेळ्याव्यात राजेश टोपे, अरविंद चव्हाण आदिनी मार्गदर्शन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar speaks at Jalna rally