सतीश चव्हाणांच्या दौऱ्यात शिवसेना-काँग्रेसचे ‘चार हात’, राष्ट्रवादीचे अकेला चलो रे

दत्ता देशमुख
Sunday, 8 November 2020

एक तर भाजपचा अद्याप उमेदवार ठरलेला नाही आणि महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण असले तरी त्यांच्या पहिल्या जिल्हासंपर्क दौऱ्यात शिवसेना आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतले घटक पक्ष ‘चार हात’ अंतरावर दिसले.

बीड : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची रणधुमाळी सुरु झाली असली तरी फक्त राष्ट्रवादी एके राष्ट्रवादी असेच चित्र आहे. एक तर भाजपचा अद्याप उमेदवार ठरलेला नाही आणि महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण असले तरी त्यांच्या पहिल्या जिल्हासंपर्क दौऱ्यात शिवसेना आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतले घटक पक्ष ‘चार हात’ अंतरावर दिसले. आता कॉन्फीडन्समुळे चव्हाणांनीच त्यांना असे ‘चार हात’ दुर ठेवले कि विचारात घेतले नाही म्हणून या दोन पक्षांतील प्रमुख नेत्यांनी अंतर राखले ही ‘अंदर कि बात’ आहे.

मराठवाडा पदवीधर निवडणूक : भाजपच्या निवडणूक प्रमुखपदी संभाजी पाटील निलंगेकर यांची नियुक्ती

सतीश चव्हाण यांनी सलग दोन वेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तशी सर्वच निवडणुकांत पक्षाची विविध सूत्रे त्यांच्या हाती असल्याने त्यांचा पक्षातील नेत्यांची चांगला संपर्क आहे. म्हणूनच कुठल्याही स्पर्धेविना पुन्हा त्यांच्याच गळ्यात पक्षाने उमेदवारीची माळ टाकली आहे. विशेष म्हणजे आता महाविकास आघाडी झालेली असतानाही शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांना ग्रहीत धरुनच त्यांना उमेदवारी मिळाली आहे. दरम्यान, त्यांनी संपर्काची जिल्ह्यात एक फेरीही केली. माजलगाव, केज, अंबाजोगाई, घाटनांदूर, शिरुर कासार, आष्टी आणि पाटोदा या प्रमुख ठिकाणी त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

पण, या सर्व बैठकांमधील चित्र ‘अकेला चलोरे’ असेच हेाते. राष्ट्रवादीचे नियोजन आणि व्यासपीठावर त्यांनाच मान होता. महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांसह इतर कोणी प्रमुख पदाधिकारी व काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांसह इतर कोणी नेत्यांची उपस्थिती नजरेस पडली नाही. इतरांची गरजच नाही असा कॉन्फीडन्स उमेदवाराला कि स्थानिक राष्ट्रवादीला आहे हे अद्याप उघड नाही. मात्र, या प्रकाराचा थोडासा कानोसा घेतला असता या दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांना कुठले निमंत्रणच नसल्याची माहिती समोर आली.

तसे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादीने या दोन्ही पक्षांना ‘हात’ दाखविल्याचा पुर्वानुभव आहे. मात्र, आताही या दोन पक्षांना ‘चार हात’ दूर ठेवण्यामागे कॉन्फीडन्स कि दुसरी काही खेळी हे लवकरच कळेल. तसे प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपचा अद्याप उमेदवार ठरला नसल्याने सतीश चव्हाणांचे अकेला चलो रे आहेच. पण, उमेदवार ठरल्यानंतर तरी या दोन पक्षांना सोबत घेतात का हे पाहावे लागणार आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena-Congress Far Away From Satish Chavan Election Tour