कॉँग्रेसच्या उर्जा मंत्र्यांचा शिवसेना - राष्ट्रवादीने गेम केला, बबनराव लोणीकर यांचा आरोप 

गणेश पांडे 
Sunday, 29 November 2020

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. या एक वर्षाच्या कार्यकाळात सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या धोरणावर बबनराव लोणीकर यांनी टिकेची झोड उठविली. रविवारी (ता.२९) ते परभणीत पत्रकारांशी बोलत होते.

परभणी ः खुद्द उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल माफ केले जाईल अशी घोषणा केली होती. परंतू, सत्तेत बसलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेसनेच कॉँग्रेसचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांचा गेम केला. त्यामुळेच उर्जामंत्र्यांनी वीज बिल माफीबद्दल घुमजाव केले असा आरोप भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी रविवारी (ता.२९) परभणीत पत्रकारांशी बोलतांना केला. पुढील निवडणुकीत या दोन्ही पक्षांना कॉँग्रेस संपवायचीच आहे असे दिसत असल्याचे श्री.लोणीकर म्हणाले. 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. या एक वर्षाच्या कार्यकाळात सरकारच्या वतीने राबविण्यात आलेल्या धोरणावर बबनराव लोणीकर यांनी टिकेची झोड उठविली. रविवारी (ता.२९) ते परभणीत पत्रकारांशी बोलत होते. या वेळी भाजप आमदार मेघना बोर्डीकर, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे, माजी आमदार मोहन फड यांच्यासह भाजपचे इतर नेते उपस्थित होते. 

हेही वाचा -  हिंगोली : शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री फसल बिमा येाजनेची अंमलबजावणी

महाविकास आघाडी सरकार शंभर टक्के अपयशी 
श्री.लोणीकर म्हणाले, सरकार स्थापनेनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जी आश्वासने दिली होती. ती आश्वासने त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. वर्षभराच्या कामकाजात सरकार शंभर टक्के अपयशी झाल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. राज्यातील शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे हे सरकार असल्याचे सांगत राज्यातील अनेक महत्वकांक्षी योजनांना स्थगिती देण्याचे काम या सरकारने वर्षभरात केले आहे. मराठवाड्याचा दुष्काळ कायमचा मिटविण्यासाठी भाजप सरकारने सुरु केलेल्या मराठवाडा वॉटरग्रिड या योजनेसही स्थगिती देण्याचे काम करून परत मराठवाड्याला दुष्काळाच्या छायेत लोटण्याचे काम या सरकारने केले आहे. 

हेही वाचा - हिंगोलीत कोरोनाचा दिवाळीपूर्वी उतरलेला आलेख वाढतोय, प्रशासनाकडून उपाययोजना

राऊत यांचा विधानावरून घुमजाव 
कोरोनाचा सामना करत असतांना राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी वीज बिलाची माफी देण्यात येणार असल्याची घोषणा कॉँग्रेसचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली होती. परंतू नंतर त्यांनी या विधानावरून घुमजाव केला. खरे तर मंत्री नितीन राऊत यांचा या विधानावरून त्यांचेच मित्र पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेसने गेम केला असल्याचा आरोप या वेळी बबनराव लोणीकर यांनी केला. यावरूनच या दोन्ही पक्षांना पुढील निवडणुकीत राज्यातून कॉँग्रेस पूर्णपणे संपवायची आहे हे स्पष्ट होत असल्याचेही ते म्हणाले.  

 
संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena-NCP played a game of Congress energy ministers, Babanrao Lonikar alleges, Parbhani News