शिवसेनेचे चिन्ह दुर्बिणीने बघावे लागेल; अब्दुल सत्तार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena symbol Abdul Sattar criticism Chandrakant Khaire Ambadas Danve

शिवसेनेचे चिन्ह दुर्बिणीने बघावे लागेल; अब्दुल सत्तार

सोयगाव : शिवसेनेचे बाण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच वाट्याला आला आहे. यामुळे खैरे यांना आता शिवसेनेचे चिन्ह दुर्बिणीद्वारेच बघावे लागेल. त्यांनी स्वप्नातही चिन्हांची अपेक्षा करू नये, अशी टीका कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

रविवारी सोयगावात कृषिमंत्री सत्तार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री. सत्तार यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना लक्ष्य केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साधेपणा असलेला मुख्यमंत्री आहे. यापूर्वीचे मुख्यमंत्री सोन्याच्या चमच्याने दूध पिणारा होता, असेही ते म्हणाले. तसेच ज्या गावातून जास्त नागरिक दसरा मेळाव्याला येतील त्या गावांना जास्तीचा निधी व ज्या गावातून कमी लोक येतील त्यांना कमी निधी देण्यात येईल, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

भाजप सोबतच्या युतीबाबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पुन्हा उल्लेख करीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोयगावात भाजपसोबत युती करणे शक्य नसून मैत्रीपूर्ण लढतीबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला असून राज्यभर जरी भाजपसोबत युती झाली तरी त्यात सिल्लोड-सोयगाव येथील युतीबाबत अपवाद राहील. शेवटी भाजपचा निर्णय अंतिम राहील असेही ते म्हणाले.

तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, नगराध्यक्षा आशाबी तडवी, उपनगराध्यक्षा सुरेखाताई काळे, शिवसेना गटनेते अक्षय काळे, श्रीराम चौधरी, ॲड. योगेश पाटील, संध्या मापारी, कुसुम दुतोंडे, लतीफ शहा, राजू घनगाव, हर्षल काळे, कदिर शहा, दीपक पगारे, संदीप सुरडकर, विष्णू इंगळे, अशोक खेडकर, धृपताबाई सोनवणे, सुरेखाताई तायडे, सुशीलाबाई इंगळे आदी उपस्थित होते.