
या मोर्चात शेकडो बैलगाडी सह हजारो शिवसैनिक फगवे झेंडे ,विविध घोषणेचे फलक हातात घेऊन सहभागी झाले होते
हिंगोलीत पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा
हिंगोली : केंद्र सरकारने पेट्रोल ,डिझेल, गॅसचे दर वाढविल्याने हे दर कमी करावेत या प्रमुख मागणीसाठी आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने शुक्रवारी (ता. पाच) बैलगाडी मोर्चा काढला. या मोर्चात शेकडो बैलगाडीसह हजारो शिवसैनिक फगवे झेंडे, विविध घोषणेचे फलक हातात घेऊन सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करीत प्रचंड घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून सोडला.
पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा बैलगाडी मोर्चा हा शिवसेना कार्यालयापासून इंदिरा गांधी चौक मार्गे निघाला यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत केंद्र शासनाच्या विरोधात संताप व्यक्त करीत दरवाढ मागे घ्यावी. अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार संतोष बांगर यांनी दिला आहे. पुढे हा मोर्चा इंदिरा गांधी चौक मार्गे शिवसेना कार्यालयावर परत आला. मोर्चा दरम्यान तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
श्रीरामाच्या भारतात पेट्रोल ९४ रुपये लिटर तर रावणाच्या लंकेत पेट्रोल ५१ असा सवाल आमदार संतोष बांगर यांनी केंद्रशासनाला केला आहे. अगोदरच महागाईने सर्वसामान्य नागरिक हैराण झालेला असताना केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल- डिझेल- गॅसचे दर वाढविले जात आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या निषेधार्थ हा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला आहे.
या बैलगाडी मोर्चात सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे, डॉ. रमेश शिंदे, सुभाष बांगर, राम कदम, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रेखाताई देवकते, परमेश्वर मांडगे, डी. के. दुर्गे, संदेश देशमुख, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, भानुदास जाधव, बाळासाहेब मगर, अंकुश आहेर, श्रीशैल्य स्वामी, नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे, राम मूळे, अनिल देशमुख, गुड्डू बांगर, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, साहेबराव देशमुख, आनंदराव जगताप, कानबाराव गरड, शहरप्रमुख अशोक नाईक, संतोष सारडा, अनिल देव, गोपू पाटील, शेषेराव पाटील, विजय पाटील बोंढारे, सोपान पाटील बोंढारे, संगीताताई चव्हाण, प्रियंकाताई खरात, सुनिताताई श्रंगारे, सुशीलाताई आठवले यांच्यासह हजारोच्या संख्येने शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
संपादन- प्रल्हाद कांबळे
|