महिलांच्या सुरक्षेसाठी शिवसेनेचा ‘हाक तुमची, साथ आमची’ उपक्रम

photo
photo

सेनगाव (जि. हिंगोली): महिला सुरक्षेचा प्रश्न बिकट होत चालला असून सायंकाळनंतर सेनगाव शहरातून ग्रामीण भागात प्रवासाच्‍या कोणत्‍याही सोयी नाहीत. या भागात कोणत्‍याही वेळी असुरक्षितता किंवा मदतीची गरज असल्‍यास महिलांसाठी शिवसेनेने ‘हाक तुमची, साथ आमची’ हे अभियान सुरू केले आहे. कोणत्‍याही क्षणी भ्रमणध्वनीवरून शिवसेना कार्यकर्त्यांशी संपर्क साधताच काही वेळातच मदतीसाठी घटनास्‍थळी कार्यकर्ते हजर होणार आहेत.

महिला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. महिलांवर अन्याय अत्‍याचाराचे प्रकार घडत आहेत. नुकतीच हैदराबाद येथे घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण देश हादरून गेला. दरम्‍यान, मानवी जीवन धावपळीचे होत असल्‍याने महिलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भागातील महिलांना निर्भिड व निसंकोचपणे प्रवास करता यावा, यासाठी शिवसेनेने एक अभियान राबविण्याचा संकल्‍प केला आहे.

ग्रामीण भागात बसेसचा अभाव

सेनगाव हे तालुक्‍याचे ठिकाण असून बाहेरगावाहून येथे सायंकाळी दाखल झालेल्‍या प्रवाशांना ग्रामीण भागात जाण्यासाठी वाहनांची मोठी उणीव आहे. सायंकाळी सातनंतर एसटी महामंडळाच्‍या बसेस नाहीत. खासगी वाहने लवकरच निघून जातात. अशा स्‍थितीत येथे येणाऱ्या नागरिकांना वाहनांसाठी ताटकळत बसावे लागत आहे. मिळेल त्‍या वाहनाने नागरिकांना घरी जावे लागते. येथील शिवसेना कार्यालयात शिवसेना उपजिल्‍हाप्रमुख संदेश देशमुख यांच्‍या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या वेळी प्रवीण महाजन, जगदीश पाटील, जगन्नाथ देशमुख, शैलेष तोष्णीवाल, संतोष देवकर, निखील देशमुख, अनिल अगस्‍ती, योगेश घाटोळकर, राजू देशमुख, वैभव देशमुख, मंगेश पवार, फेरोज पठाण, विष्णू वाघमारे, राजू जाधव, अनिल गिते, अवेश पठाण, संजय चिलगर, गजानन बोरकर, अविनाश खताळ, विलास हराळ, गजानन थिटे आदी उपस्‍थित होते.

‘हाक तुमची, साथ आमची’ अंतर्गत मदत

या वेळी शहरात बाहेरगावाहून दाखल झाल्‍यानंतर सायंकाळी वाहनाअभावी परत स्‍वतःच्‍या गावी जाण्यासाठी महिलांची गैरसोय होत आहे. त्‍यामुळे वेळप्रसंगी वाहनाद्वारे या भागातील महिलांना सुखरूप त्‍यांच्‍या घरी नेण्याची व्यवस्‍था केली जाईल. तालुक्‍यात कोठेही, कोणत्‍याही क्षणी ज्‍या महिलांना असुरक्षित आहे, याची शंका आल्‍यास तत्‍काळ संपर्क साधल्‍यास घटनास्‍थळी कार्यकर्ते दाखल होतील. अनुचित प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घेण्यासाठी शिवसेनेने ‘हाक तुमची, साथ आमची’ या अभियानांतर्गत मदत देण्यात येणार असल्‍याचा निर्णय घेण्यात आला.

भ्रमणध्वनीचे बॅनर लावले जाणार

शिवसेनेचे हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी शहरासह तालुक्‍यातील प्रमुख ठिकाणी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व स्‍थानिक पोलिस ठाणे असे भ्रमणध्वनीचे बॅनर लवकरच लावले जाणार आहेत. संकटात सापडलेल्‍या महिलांना थेट संपर्क साधण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे.

- संदेश देशमुख, उपजिल्‍हा प्रमुख, शिवसेना
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com