सातव्या मजल्यावरून मुख्यमंत्र्यांना खाली आणू - सुभाष देसाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

लातूर - पंतप्रधान मोदींचे राज्य बनवाबनवी करणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचे खरे प्रश्न सुटलेच नाहीत. हे प्रश्न सोडविण्यासाठीच शिवसेनेला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता हवी आहे, असे सांगत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वबळावर जोर दिला. लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करून सरकारचे डोळे खाडकन उघडू. सातव्या मजल्यावर बसलेल्या मुख्यमंत्र्यांना आता खाली आणू, असेही ते म्हणाले.

लातूर - पंतप्रधान मोदींचे राज्य बनवाबनवी करणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांचे खरे प्रश्न सुटलेच नाहीत. हे प्रश्न सोडविण्यासाठीच शिवसेनेला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता हवी आहे, असे सांगत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वबळावर जोर दिला. लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करून सरकारचे डोळे खाडकन उघडू. सातव्या मजल्यावर बसलेल्या मुख्यमंत्र्यांना आता खाली आणू, असेही ते म्हणाले.

शिवसेनेचा जिल्हा मेळावा येथे गुरुवारी (ता. २८) झाला. त्यात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. शिवसेनेचे मराठवाडा संपर्कनेते, खासदार चंद्रकांत खैरे, महिला आघाडीच्या शिल्पा सरपोतदार, अभय साळुंके, संतोष सोमवंशी, सुनील वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

देसाई म्हणाले, ‘‘निवडणुकीवेळी प्रत्येकाच्या खात्यावर १५ लाख रुपये जमा करू, असे मोदींनी सांगितले होते. आतापर्यंत पंधरा चिंचुकेही आले नाहीत. रोजगार, शेतमाल-दूध दरासह अनेक आश्‍वासनांचे असेच झाले. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना आधीपासून दक्ष आहे. यापुढेही ती लोकसेवेतच राहणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी एकत्र यावे, आंदोलने करावीत. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून राज्यात शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही.’’

खैरे म्हणाले, ‘‘लातूर पॅटर्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात भ्रष्टाचार, दादागिरी, गुंडगिरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. लोकांचे खून होत आहेत. राज्यात भाजपचे सरकार असताना हे घडत आहे आणि काँग्रेस आघाडी सत्ताधारी असतानाही हेच घडत होते. त्यामुळे नागरिकांना आता बदल हवा आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे. मैदानात उतरून आंदोलने करावीत. या भागातील सहाही आमदार आपले असावेत आणि खासदारही. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच रस्त्यावर उतरले पाहिजे.’’

रेल्वे बोगी कारखान्याचे श्रेय आमचे
रेल्वे बोगी कारखाना महाराष्ट्रात, तोही लातुरात झाला पाहिजे, असा आमचा आग्रह होता. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन हा प्रकल्प मंजूर करून घेतला; पण भाजपच्या नेत्यांनी त्याचे श्रेय स्वत:च्या नावावर घेतले आणि भूमिपूजनही उरकून घेतले. त्यावेळी आम्ही गप्प राहून सर्व पाहत होतो. यापुढे तसे होणार नाही. रेल्वे बोगी कारखान्यातील भरती प्रक्रिया लातूरमधूनच झाली पाहिजे. परीक्षा घ्यायची असेल तर जरूर घ्या; पण तीही लातूरमध्येच झाली पाहिजे. भोपाळ, दिल्ली अशा शहरांत नको. त्यावर आमचे लक्ष राहील, असेही देसाई म्हणाले.

आपण एक कुटुंब आहोत, कुटुंबासारखेच वागा. आपल्या पक्षात गटबाजी असता कामा नये. यापुढे तसे झाल्यास गय करणार नाही. उद्धव ठाकरे साहेबांना सांगून गटबाजी करणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करीन. 
- चंद्रकांत खैरे, खासदार, मराठवाडा संपर्कनेते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsena district campaign subhash desai politics chief minister