Video : आमदारांच्या वाढदिवशी लागली कांदे घ्यायला रांग

जगदीश पानसरे 
सोमवार, 9 डिसेंबर 2019

वाढदिवसानिमित्त कांदे वाटपाची कल्पना सुचली. कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असताना गोरगरीब जनतेला काही प्रमाणात का होईना दिलासा देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न होता.

औरंगाबाद : राजकीय नेत्यांचे वाढदिवस म्हटले की, तामझाम, खाद्यपदार्थांची रेलचेल, फटाक्यांची आतषबाजी आणि डीजेच्या तालावर नाचगाणे असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. परंतु याला छेद देत शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी मात्र आपला वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. सध्या कांद्याच्या भाववाढीने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे, नेमका हाच धागा पकडत दानवे समर्थकांनी शहरातील गरीब वस्तीमध्ये जाऊन चक्क दहा क्विंटल कांद्याचे वाटप केले.

औरंगाबाद जालना-स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांचा वाढदिवस रविवारी (ता. आठ) विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा झाला. लहान मुलांना मोफत उपचार व औषधी पुरवठा करून तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत त्यांनी हा वाढदिवस साजरा केला. त्याचबरोबर गोरगरिबांना पोटभर अन्न मिळावे म्हणून शिवभोजन गाड्याच्या माध्यमातून दहा रुपयात भरपेट जेवण देण्याची योजना देखील राबवली.

काय झालं - बायकोला चांगले वागवीन म्हणाला, म्हणून...

दुसर्‍या दिवशी सोमवारी (ता. नऊ) दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी अनोखा उपक्रम राबवत इतरांनाही प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे .कांदा महाग झाल्याने सध्या सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, हेच ओळखून दानवे यांच्या समर्थकांनी शहरातील गरीब वस्त्यांमध्ये जाऊन तब्बल दहा क्विंटल कांदे वाटप करत दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

सर्वसामान्य माणसाला मदत हीच शिकवण - दानवे

गोरगरीब सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणे त्यांना मदत करणे हीच शिकवण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हा शिवसैनिकांना दिली आहे. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या त्यांनी आखून दिलेल्या सूत्रानुसार आम्ही वाटचाल करत आहोत. वाढदिवसानिमित्त कांदे वाटपाची कल्पनादेखील यातूनच सुचली. कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असताना गोरगरीब जनतेला काही प्रमाणात का होईना दिलासा देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न होता, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MLA Distributed Onions on His Birthday in Aurangabad