बायकोला चांगले वागवीन म्हणाला, म्हणून... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

घरगुती कारणावरून पीडितेला तिच्या सासूने शिवीगाळ व मारहाण केली; तर पती सय्यद रहीम याने "तू माहेराहून व्यवसायासाठी पैसे का आणत नाही' म्हणत मारहाण केली व घराबाहेर काढले, तसेच ठार मारण्याची धमकीही दिली.

औरंगाबाद : कपड्यांचा व्यवसाय करण्यासाठी माहेराहून पैसे आण म्हणत विवाहितेला शिवीगाळ, मारहाण करून घराबाहेर हाकलून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात आरोपी पतीची एक वर्षाच्या चांगल्या वर्तवणुकीच्या हमीवर व 15 हजारांच्या वैयक्तिक बंधपत्रावर अटी व शर्तींसह मुक्तता करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी दिले. सय्यद रहीम सय्यद नवाब (26, रा. मुजीब कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे. 

शिरीन सय्यद रहीम हिने या प्रकरणात तक्रार दिली होती. त्यानुसार पतीसह तिच्या सासरकडच्यांनी कपड्यांच्या व्यवसायासाठी माहेराहून 20 हजार रुपये आण असा तगादा लावला होता. त्यामुळे ही बाब पीडितेने माहेरी सांगितली. त्यानुसार आरोपींना 20 हजार रुपये देण्यात आले; मात्र आरोपींनी आणखी 50 हजार रुपयांची मागणी केली. त्याला पीडितेने नकार दिला.

सेक्ससाठी तीन हजार रुपयांचा रेट

त्यामुळे आरोपींनी तिचा छळ सुरू केला. 22 सप्टेंबर 2015 ला दुपारी 4 वाजता घरगुती कारणावरून पीडितेला तिच्या सासूने शिवीगाळ व मारहाण केली; तर पती सय्यद रहीम याने "तू माहेराहून व्यवसायासाठी पैसे का आणत नाही' म्हणत मारहाण केली व घराबाहेर काढले, तसेच ठार मारण्याची धमकीही दिली.

घाटीत या आजाराचे तब्बल 50 रुग्ण

या प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपी सय्यद रहीम याला दोषी धरून कलम 323 अन्वये वरीलप्रमाणे शिक्षा ठोठाविली. तसेच दंडाच्या रकमेपैकी 7 हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून पीडितेस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Court Granted Bell to a Man in Domestic Violence Case in Aurangabad