‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने दुमदुमले तुळजापूर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

तुळजापूर - अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या भव्य शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी तुळजाभवानी मंदिरातील गोमुख तीर्थकुंडातील पाण्याचे दोन कलश घेऊन भाजपचे पदाधिकारी गुरुवारी (ता. २२) मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी मंदिरात तुळजाभवानी मातेच्या मूर्तीसमोर विधिवत पूजन करण्यात आली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. 

तुळजापूर - अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या भव्य शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी तुळजाभवानी मंदिरातील गोमुख तीर्थकुंडातील पाण्याचे दोन कलश घेऊन भाजपचे पदाधिकारी गुरुवारी (ता. २२) मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी मंदिरात तुळजाभवानी मातेच्या मूर्तीसमोर विधिवत पूजन करण्यात आली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. 

तुळजाभवानी मंदिरात दुपारी दीडच्या सुमारास भाजप कार्यकर्ते एकत्रित आले. आमदार सुजितसिंह ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, ॲड. अनिल काळे यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते गोमुख तीर्थकुंडावर आले होते. गोमुख तीर्थकुंडातील पाण्याने दोन कलश भरुन सर्वजण तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात गेले. तुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर कलश ठेवून विधिवत पूजा करण्यात आली.

तुळजाभवानी मातेची आरती करण्यात आली. किरण पाठक व दादा ढोले यांनी वेदमंत्र पठण केले. त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यातून न्हाणीगृहासमोरून कलश गोंधळी कट्टा व होमकुंडासमोर आणला. या वेळी गोंधळी मंडळींनी संबळाचा निनाद केला तर वासुदेवाने हातात टाळ आणि चिपळी वाजविली.

आमदार ठाकूर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक मुंबईत होत आहे. सुमारे तीन हजार ६०० कोटी रुपये खर्च त्यासाठी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी मातेने भवानी तलवार दिली. त्याच तुळजाभवानी मातेच्या पवित्र गोमुख तीर्थकुंडातील जल मुंबईत शिवस्मारकाच्या पूजनासाठी आम्ही घेऊन जात आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा कलश सुपूर्द करणार आहोत. शहाजीराजे यांचे वास्तव्य परंड्याच्या ऐतिहासिक किल्ल्यात झाले. परंडा किल्ल्यातील आणि नळदुर्ग येथील किल्ल्यातील माती शिवस्मारकासाठी जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर मुळे, कोषाध्यक्ष नागेश नाईक, विकास मलबा, इंद्रजित साळुंके, माजी शहराध्यक्ष शिवाजी डावकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन वडणे, डॉ. गोविंद कोकाटे, युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष विपिन शिंदे, माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंद रोचकरी, विजय शिंगाडे, गिरीश देवळालकर, छावा युवा मराठा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष जीवन इंगळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 
 

ऐतिहासिक क्षण
तुळजाभवानी मंदिरातील गोमुख तीर्थकुंडातील पाणी शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी नेण्याचा ऐतिहासिक क्षण तुळजाभवानी मंदिरात नोंदविण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivsmarak inauguration