शिवस्वराज्य यात्रेमुळे भाजप-शिवसेनेला धडकी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा गेवराई, पाटाेदा व बीड शहरात गेली. पाटाेदा येथील सभेत खासदार डॉ. अमाेल काेल्हे यांनी सरकारचा समाचार घेतला.

पाटाेदा (जि. बीड) - शिवस्वराज्य यात्रेला राज्यभरात मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून भाजप व शिवसेनेला धडकी भरली आहे. पाच वर्षांत भाजपने सर्वच बाबतीत जनतेचा अपेक्षाभंग केला आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमाेल कोल्हे यांनी रविवारी (ता. 25) केले.

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त पाटोदा येथे जाहीर सभा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. काेल्हे म्हणाले, की पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाला विविध नऊ खात्यांचे राज्यमंत्रिपद दिले होते; मात्र सत्तेच्या उबीमुळे काही जणांनी दुसरीकडे उड्या मारल्या; आता मात्र निर्णयाची वेळ आली आहे. 

या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाच्या आर्थिक अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, आज देशातील आघाडीच्या अनेक कंपन्यांची उत्पादन क्षमता 50 टक्‍क्‍यांवर आलेली आहे. या कंपन्या दिवाळखोरीत निघत असून, या कंपन्या मोठ्या संख्येने कर्मचारी कपात करीत आहेत. त्याच्या झळा सर्वसामान्य माणसाला बसत आहेत. आज दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांमध्ये काम करणारे बहुतांश तरुण हे ग्रामीण भागातील आहेत. त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड सरकारच्या आर्थिक नीतीने कोसळली आहे. राज्यातील सत्ता पालटवण्यासाठी जनतेने राष्ट्रवादी कॉंग्रेसला साथ द्यावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsvarajya Yatra receives spontaneous response across the state