अबब, एकाच रात्री चार वेगवेगळ्या आगीच्या घटना...

aag
aag

कळमनुरी ः तालुक्यातील वाई येथे रविवारी (ता.दहा) रात्री नऊच्या सुमारास वीजतारांच्या घर्षणामुळे एका घराला व दोन गोठ्याला आग लागून संसारापयोगी व शेती साहित्यासह चाळीस कोंबड्या जळून भस्मसात झाल्याने एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. आगीच्या उर्वरित दोन घटनांमध्ये सांडस व शहरातील गोदा फार्म परिसरात आग लागण्याच्या घटना घडल्या. मात्र, अग्निशमन दलाने तातडीने ही आग आटोक्यात आणली.

रविवारी रात्री सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे शहरासह ग्रामीण भागामधील वाई व सांडस येथे आग लागण्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दल व नागरिकांनी तत्परता दाखविल्यामुळे आग आटोक्यात आली. तर सांडस गावालगत असलेले शेतीचे कुंपण पेटल्यामुळे नागरिकांची आग विझविण्यासाठी धावपळ झाली. दरम्‍यान, वाई येथील लक्ष्मण साबळे यांच्या झोपडी वजा घरावर वीजतारांच्या घर्षणामुळे रात्री साडेआठच्या सुमारास आग लागली. या वेळी जोरदार वारा वाहत असल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले.

ग्रामस्‍थांनी जमेल त्या पद्धतीने आग विझविली
या वेळी शकूराव मुकाडे, नामदेव लाखाडे, सदाशिव खुडे ,दौलत धनवे, बळवंत पोटे, सुधाकर गुहाडे, लक्ष्मण गुहाडे, व्यंकट मुकाडे, बाबूराव धनवे यांच्यासह ग्रामस्‍थांनी जमेल त्या पद्धतीने पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वादळी वारे वाहत असल्यामुळे ही आग लक्ष्मण साबळे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या प्रसाद रामजी मेंढे यांच्या गोठ्यापर्यंत पसरली. त्याच्या बाजूलाच असलेल्या सटवा पोटे यांच्या गोठ्याला ही आगीने वेढले. प्रसंगावधान राखून सरपंच शकूराव मुकाडे यांनी कळमनुरी येथे पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे वाहन पोचल्यानंतर चालक त्रंबक जाधव यांनी गावकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत लक्ष्मण साबळे यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य, प्रसाद मुंडे यांच्या गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य व चाळीस कोंबड्या व सटवा पोटे यांच्या गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. या आगीमध्ये या शेतकऱ्यांचे जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला. सोमवारी (ता. ११) मंडळ अधिकारी श्री. नाईक यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

इतर दोन घटनेतही नुकसान  
अन्य एका घटनेत सांडस येथे रात्री नऊ वाजेच्या सुमारास गावालगत असलेल्या कुंपणाने पेट घेतल्यामुळे मोठी आग लागली. मात्र, गावातील बाजीराव पाटील, गजानन धावंडकर, धोंडबा निरगुडे, प्रल्हाद निरगुडे, कुंडलिक निरगुडे, मनोज पातळे, सुधीर जाधव, मुकुंदराव होडबे, गणेश जाधव, शिवाजी निरगुडे यांच्यासह नागरिकांनी एकत्र येत गावापर्यंत पोचलेली आग आटोक्यात आणली. यासाठी कुंडलिक निरगुडे यांच्या वॉटर प्लांटमधून पाणी मिळवत नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अन्य एका घटनेत शहरातील गोदा फार्म परिसरात हरभरा पिकाच्या कुटाराला आग लागली. मात्र, वादळी वाऱ्यामुळे ही आग इतरत्र पसरण्याचा धोका पाहता कर्मचारी व नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या ठिकाणी अग्निशमनच्या वाहनाने वेळेवर पोचून आग आटोक्यात आणली. 


कुर्तडी येथे गोठ्याला आग​
वारंगाफाटा ः कळमनुरी तालुक्‍यातील कुर्तडी येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्याला रविवारी (ता.१०) रात्री अचानक आग लागून गोठ्यात असलेले शेती साहित्य जनावरांची वैरण जळून अंदाजे एक ते दीड लाख रुपयाचे नुकसान झाले. कुर्तडी येथील शेतकरी गोविंदराव जाधव यांचा शेतात जनावरांसाठी बांधलेला गोठा आहे. रविवारी रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास गोठ्यास अचानक आग लागली. या वेळी श्री.जाधव घरी होते. त्‍यांना याबाबत मोबाईलवरून माहिती आल्यानंतर त्‍यांनी शेताकडे धाव घेतली. या वेळी त्‍यांच्यासोबत गावकरी देखील होते. लागलेल्या आगीवर गावकऱ्यांनी पाणी ओतने सुरू केले. आग आटोक्‍यात येईपर्यंत गोठ्यात ठेवलेले शेती साहित्यासह पाच क्‍विंटल सोयाबीन, तीन क्‍विंटल हळद तसेच जनावरांसाठी ठेवलेली वैरण जळुन खाक झाल्याने अंदाजे एक-दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे श्री. जाधव यांनी सांगितले. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com